मोदींचे कार्टून, नीरव मोदी, मल्ल्या यांच्या छायाचित्रांमुळे फिल्मला परवानगी नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 05:27 AM2019-04-20T05:27:12+5:302019-04-20T05:29:39+5:30
नरेंद्र मोदींसारखे कार्टुन दिसते. नीरव मोदी, विजय मल्ल्या यांची छायाचित्रे आहेत,
ठाणे : नरेंद्र मोदींसारखे कार्टुन दिसते. नीरव मोदी, विजय मल्ल्या यांची छायाचित्रे आहेत, म्हणून मीडिया सेंटरचे सचिव मिलिंद दुसाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या निवडणूक प्रचार फिल्मला परवानगी नाकारण्याची धक्कादायक माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
राज्य निवडणूक आयोगाने येत्या २४ तासांत हस्तक्षेप करत न्याय द्यावा, अन्यथा निवडणूक प्रचार बंद करू, असा इशाराही त्यांनी दिला.
राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या निवडणूक प्रचाराच्या फिल्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे कार्टुन दिसते तसेच हजारो कोटींचा बँक घोटाळा करून देशातून फरार झालेले आरोपी नीरव मोदी, विजय मल्ल्या यांची छायाचित्रे या फिल्ममध्ये आहेत. या कारणामुळे ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी व निवडणूक विभागाच्या मीडिया सेंटरचे सेक्रे टरी मिलिंद दुसाने यांनी या प्रचार फिल्मला परवानगी नाकारली आहे. कार्यकर्त्यांवर मानसिक दबाव टाकण्यासाठी, नंदलाल प्रकरणाच्या पोस्टरला चार दिवसांनी उशिरा परवानगी देणे, प्रचाराच्या उर्वरित तीन फिल्मला परवानगीसाठी ताटकळत ठेवणे, प्रचार साहित्याला जाणीवपूर्वक उशिरा परवानगी देणे, हे प्रकार सुरळीत सुरू असलेल्या निवडणुकीच्या कामात खोडा घालणे आणि एका विशिष्ट पक्षाला याचा फायदा व्हावा, यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
>आनंद पराजंपे यांच्या निवडणूक प्रचारासाठी फिल्म बनवण्यात आली होती. या फिल्ममध्ये भाजपला टार्गेट करत नरेंद्र मोदींचे कार्टुन,नीरव मोदी, विजय मल्ल्या यांची छायाचित्रे वापरली होती.