प्रभात फिल्म सोसायटीचे संस्थापक चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे निधन

By प्रज्ञा म्हात्रे | Published: January 1, 2023 05:49 PM2023-01-01T17:49:49+5:302023-01-01T17:52:48+5:30

प्रभात फिल्म सोसायटीचे संस्थापक, चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे दुपारी तीनच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

Film scholar Sudhir Nandgaonkar passed away | प्रभात फिल्म सोसायटीचे संस्थापक चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे निधन

प्रभात फिल्म सोसायटीचे संस्थापक चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे निधन

googlenewsNext

ठाणे : प्रभात फिल्म सोसायटीचे संस्थापक, चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे दुपारी तीनच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. माजीवडा येथे ते वास्तव्यास होते, मुलगी, मुले सुना, जावई, पत्नी, नातवंडे आहेत. गेले ५६ वर्षे प्रभात फिल्म सोसायटीचे काम पाहत होते. बऱ्याच फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. मामी फेस्टिव्हल हा नांदगावकर यांच्या संकल्पनेतून उभा राहीला होता.

नाटकाचे वेड असलेल्‍या महाराष्‍ट्रात सिनेमासारखी नवी विज्ञानाधिष्ठित कला रुजवण्‍याचे खडतर काम सुधीर नांदगावकरने केले. त्याने महाराष्‍ट्रात आणि भारतातही फिल्‍म सोसायटीची चळवळ पसरवली. नांदगावकरचा प्रवास छापील माध्‍यमाकडून दृकश्राव्य माध्‍यमाकडे असा झालेला दिसतो.

नांदगावकर हा साहित्यशास्त्राचा विद्यार्थी, तो मराठी घेऊन एम.ए. झाला. अनंत काणेकर, रमेश तेंडुलकर अशा प्राध्यापकगणांच्या संगतीत वाढला. त्‍याला कवितांची विशेष आवड होती. त्याने काही काळ मुंबईच्या पोद्दार कॉलेज मध्ये मराठी विषय शिकवलादेखील, पण त्या काळी सारा सांस्कृतिक माहोल बदलत होता. नव्या विचारांची व त्याचबरोबर नव्या कलांची समजूत समाजात पसरत होती, त्या टप्प्यावर नांदगावकर सिनेमाकडे, माध्यम म्हणून खेचला गेला. भारतदेश तसा सिनेमावेडा 1930 नंतर (बोलपट अवतरल्यानंतर) झाला होताच. स्वातंत्र्योत्तर, ते खूळ वाढतच गेले. पोटाला मिळाले नाही तरी लोक झुंडीने सिनेमा थिएटरांत जात होते.

भारतात सिनेमाने असे व्यसनाचे स्वरूप धारण केले असताना जगात सिनेमा माध्यमातील कलात्मकता शोधण्याचे प्रयोग चालू होते आणि ते नांदगावकरची पिढी वयात आली तोवर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, फिल्म सोसायटी चळवळ अशा व्यासपीठांमार्फत भारतात येऊन पोचले होते. नांदगावकर ‘फिल्म फोरम’ या संस्थेचा सभासद बनला तो 1964-65 च्या सुमारास. तेथे तो जागतिक सिनेमा पाहून प्रभावित झाला आणि त्याच्या पुढाकाराने 5 जुलै 1968 रोजी प्रभात चित्र मंडळाची स्थापना झाली. नांदगावकर म्हणतो, की ‘प्रभात’ स्थापन करण्यामागे दोन हेतू होते: एक- फिल्म सोसायटी चळवळ दक्षिण मुंबईत केंद्रित झाली होती, ती उपनगरांत आणायची आणि दुसरा हेतू म्हणजे मराठी माणसांना चांगल्या सिनेमाची, या माध्यमातील ‘कले’ची जाण करून द्यायची.

प्रभात चित्र मंडळ अव्याहत चालू आहे. नांदगावकरने दोन्ही हेतू साधण्यासाठी परोपरीने प्रयत्न केले, पण त्याची खंत अशी, की मराठी समाज काही त्याच्या प्रयत्नांना बधला नाही. तो आपल्या डबक्यातील साहित्यकलेत खुळावून राहिला. टेलिव्हिजनचे माध्यम आल्यानंतर तर तो त्यात अधिकच रमून गेला! ‘प्रभात’ने जुने भारतीय-मराठी अभिजात सिनेमा दाखवले, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवले, वेगवेगळ्या देशांच्या उत्तमोत्तम चित्रपटकृती आणवत त्यांचे प्रदर्शन घडवले, भारतीय समांतर सिनेमाची माहिती करून दिली, चित्रपटविषयक चर्चा घडवून आणल्या, ‘प्रभात’च्या या कार्यक्रमांचा कर्ता असे तो नांदगावकर. कार्यक्रमांना प्रेक्षक-श्रोत्यांची गर्दी होई, परंतु त्यांमुळे त्यांची उत्सुकता, जिज्ञासा वाढल्याचे आढळून आले नाही.

Web Title: Film scholar Sudhir Nandgaonkar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे