गाणी, भाषणे, संवाद ऐकत साकारली तैलचित्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:37 PM2019-09-21T23:37:53+5:302019-09-21T23:38:12+5:30
महापालिकेचा उपक्रम; ठाणेकर किशोर नादावडेकरांची २३ पोट्रेट
ठाणे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या डॉ. घाणेकरांच्या तैलचित्रातील घाणेकरांची नजर आता मी एकटा नाही, हेच जणू सांगत आहे. कारण, आता डॉ. घाणेकर नाट्यगृहात काही दिवंगत, तर काही हयात कलावंत, राजकीय नेते यांच्या तब्बल २३ तैलचित्रांचे अनावरण करण्याचा सोहळा अलीकडेच संपन्न झाला. कलाक्षेत्रातील दिग्गज दिवंगत कलावंत आणि कलेला कायम प्रोत्साहन देणाऱ्या राजकीय नेत्यांची ही हुबेहूब आणि रेखीव तैलचित्रे साकारली आहेत, ठाणेकर चित्रकार किशोर नादावडेकर यांनी.
मुंबईतील नाट्यगृहांच्या धर्तीवर ठाण्यातील नाट्यगृहातही नाट्यकर्मींची चित्रे असावी, या उद्देशाने ठाणे महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला. यापूर्वी गडकरी रंगायतनमध्ये पु.ल. देशपांडे आणि आनंद दिघे यांचे तर घाणेकर नाट्यगृहात डॉ. घाणेकरांचे पूर्णाकृती तैलचित्र आहे. ही चित्रेही नादावडेकर यांनीच साकारलेली आहेत. चित्रकलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण नसतानाही केवळ आवड, सराव आणि कलेची साधना यामुळे चित्रकलेशी ते समरस झाले असून आज चित्रकलेच्या क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. ठाणे महानगरपालिकेने मला २३ तैलचित्रे काढण्यास सांगितल्यावर गेले पाचसहा महिने मी त्यावरच काम करीत होतो. या दिग्गजांची माहिती, नातेवाइकांशी चर्चा करून त्यांचे विविध फोटो मिळवले. इतकंच नव्हे तर त्यांचे चित्र कॅनव्हॉसवर रेखाटताना मी कॉम्प्युटरवर त्यांची माहिती किंवा गाणी किंवा त्यांची भाषणे ऐकायचो. त्यामुळे ही सर्व मंडळी माझ्यासमोरच आहेत अथवा माझ्याशी गप्पा मारत आहेत, असा भास मला व्हायचा, असे मत किशोर नादावडेकर यांनी व्यक्त केले.
यांची आहेत तैलचित्रे : स्वा. विनायक सावरकर, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, अजातशत्रू वसंत डावखरे, पु.ल., शाहीर साबळे, पंडित भीमसेन जोशी, शाहीर विठ्ठल उमप, बालगंधर्व, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, सुलोचनादीदी, प्रभाकर पणशीकर, सुलभा देशपांडे, मच्छिंद्र कांबळी, लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, विनय आपटे, आनंद अभ्यंकर, रीमा लागू, सतीश तारे, रसिका जोशी यांच्या तैलचित्रांनी डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या भिंती बोलू लागल्या आहेत.