ताडी व्यवसायाला अखेरची घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 11:57 PM2020-12-18T23:57:32+5:302020-12-18T23:57:36+5:30
सर्वच सत्ताधाऱ्यांनी व्यापारीकरणाचे धोरण राबविल्याने हा व्यवसाय आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर
- हितेन नाईक
पालघर : अल्पभूधारक व बेरोजगार असलेल्या भंडारी समाजाच्या परंपरागत ताडी व्यवसायाला आता अखेरची घरघर लागली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी ताडी व्यवसाय खुला करून या समाजाच्या उदरनिर्वाहाच्या साधनासह सहकार्याची बीजे घट्ट रोवली होती, परंतु नंतर सर्वच सत्ताधाऱ्यांनी व्यापारीकरणाचे धोरण राबविल्याने हा व्यवसाय आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे अन्यायाविरोधात मोर्चे-आमरण उपोषणाद्वारे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष विजय राऊत यांनी दिला आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू ते एडवण या भागात राहणाऱ्या भंडारी समाजाचा शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी शेतीव्यतिरिक्त खाजरी-माडावरून निघणाऱ्या ताडी विक्रीचा जोडधंदा हा समाज अनेक वर्षांपासून करीत आला आहे.
१९६८ सालापासून ताडी व्यवसायाला सुरुवात होत आज सहकारी संस्थांच्या माध्यमातून हा शेतीपूरक व्यवसाय सुरू ठेवला असताना शासनाच्या ताडी विक्री परवान्याबाबतच्या बदलत्या धोरणाचा फटका सहकारी संस्थांना बसून धनदांडग्यांचा शिरकाव या व्यवसायात सुरू झाला आहे.
परप्रांतीय व्यावसायिकांना शिरकाव करून देताना शासनाचे बदलते धोरण स्थानिक भंडारी व्यावसायिकांना उद्ध्वस्त करीत आहे. परिणामी, अधिक उत्पन्न मिळविण्याच्या नावाखाली शरीराला पोषक असणाऱ्या या पेयाचे डुप्लिकेशन करून या व्यवसायाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आंदाेलनाचा इशारा दिला आहे.
या धंद्यापासून भंडारी समाजास सारले जात आहे दूर
या धंद्यापासून भंडारी समाज दूर सारला जाऊ लागला असून सहकारी संस्था हळूहळू बंद पडू लागल्या आहेत. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या ४० संस्थांपैकी सातपाटी, वडराई, माहीम येथील फक्त तीन सहकारी संस्था मागील काही वर्षांपासून तग धरून हा व्यवसाय वाचविण्याचा खटाटोप करीत असल्याचे अध्यक्ष विजय राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. २०१२ पासून तत्कालीन राज्यमंत्री व विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्यापासून ते विद्यमान पालकमंत्री दादासाहेब भुसे अशा डझनभर मंत्र्यांना आतापर्यंत निवेदने देण्यात आल्यानंतरही भंडारी समाजाच्या समस्या आजही जैसे थे आहेत.