अखेर वर्तकनगरच्या ‘त्या’ १०८ पोलीस कुटुंबियांचे होणार पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:38 PM2019-07-02T22:38:38+5:302019-07-02T22:48:53+5:30
ठाण्याच्या वर्तकनगर येथील धोकादायक इमारतीमधील पोलीस कुटुंबाना तात्काळ घरे खाली करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेने दिले होते. याच ५१ ते ५२ या तीन इमारतींमधील १०८ कुटूंबियांचे एमएमआरडीएच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
ठाणे: येत्या ४८ तासांमध्ये घरे रिक्त करा, असे आदेश मिळालेल्या वर्तकनगर येथील ५१ ते ५३ या तीन इमारतींमधील १०८ पोलीस कुटुंबियांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. या सर्व कुटुंबियांचे एमएमआरडीएच्या सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.
ठाण्याच्या वर्तकनगर येथील धोकादायक इमारतीमधील पोलीस कुटुंबाना तात्काळ घरे खाली करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी दिले होते. त्यामुळे या वसाहतीमधील पोलीस कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण होते. याबाबत पोलीस महिला मंडळाच्या वतीने शैला जाधव, तसेच स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख प्रशांत सातपुते यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कैफियत मांडली होती. या पार्श्वभूमीवर ऐन पावसाळ्यात योग्य पुनर्वसनाशिवाय पोलीस कुटुंबियांना बेघर करु नका अशी विनंती पालकमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. याच विनंतीची तात्काळ दखल घेत या धोकादायक इमारतीमधील पोलीस कुटुंबांचे पुनर्वसन त्वरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांना मंगळवारी दिले. दरम्यान, इमारत क्रमांक १४ आणि १६ या धोकादायक असल्या तरी त्या दुरुस्त करुन राहण्यास योग्य असल्यामुळे त्यांचे स्थैर्यता प्रमाणपत्र पालिकेने पोलीस प्रशासनाकडे मागितले आहे. गेली तीन ते चार महिने इमारत क्रमांक १४ आणि १६ ची दुरुस्ती करण्यात आली असल्यामुळे या दोन्ही इमारतींचे स्थैर्यता प्रमाणपत्रही सार्वजनिक बांधकाम विभागाने पालिका प्रशासनाकडे देण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या या पाठपुराव्यामुळे पोलीस कुटुंबियांनी आभार व्यक्त केले आहे.