अखेर स्वप्नील पाटीलसह 8 जणावर उल्हासनगरमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल, मूळ प्रकरण काय?
By सदानंद नाईक | Updated: December 28, 2024 19:41 IST2024-12-28T19:39:43+5:302024-12-28T19:41:12+5:30
बांधकाम व्यावसायिक राजा गेमनानी यांनी खंडणी मागत असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

अखेर स्वप्नील पाटीलसह 8 जणावर उल्हासनगरमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल, मूळ प्रकरण काय?
उल्हासनगर : शहरातील बांधकाम व्यवसायिक व भाजप पदाधिकारी राजा गेमनानी यांच्याकडे एक कोटीची खंडणी मागणाऱ्या स्वप्निल दिलीप पाटील यांच्यावर एकूण ८ जणावर हिललाईन पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली असून, पाटील व शैलेश तिवारी यांना पोलिसांनी हिललाईन पोलीस ठाण्यात बोलावून चार तास चौकशी केली.
उल्हासनगर कॅम्प नं- ५, परिसरात राहणारे राजा गेमनानी हे बांधकाम व्यवसायिक व भाजपचे स्थानिक पदाधिकारी आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यात काही जण १ कोटीची खंडणी मागत असल्याची तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांना केली होती.
अखेर शनिवारी हिललाईन पोलीस ठाण्यात स्वप्नील पाटील, शैलेश तिवारी यांच्यासह एकूण आठ जणावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. गेमनानी यांनी तक्रारीत म्हटले की, त्यांचे गायकवाड पाडा व समतानगर कुर्ला कॅंप येथे बाधकामे सुरु आहेत. या बांधकामाबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे ॲड स्वप्निल पाटील यांनी राजेश गेमनानी यांना महापालिकेतील नगररचना विभागाच्या दालनात भेटून तुम्ही शंभर कोटीचा टीडीआर घोटाळा केला. आम्ही हिलटाऊन, झलक व कलानी सोसायटी या इमारतीच्या तक्रारी केल्या आहेत. तेव्हा तुमच्या बांधकामाच्या तक्रारी करायच्या नसतील तर तुम्ही मला एक कोटी रुपये द्या. अशी मागणी केली. गेमनानी यांनी पाटील यांना पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. तेंव्हा पाटील व त्याच्या साथीदारांनी नगरविकास विभागचे प्राधान सचिव आणि संचालक नगररचना विभाग यांना तक्रारी केल्या आहेत.
दरम्यान काही दिवसांनी नेताजी चौकात ॲड .स्वप्निल पाटील यांनी माझ्याकडे एक कोटी ऐवजी २५ लाखाची मागणी केली. त्याने सांगितले की मला ही माणसे सांभाळावी लागतात. त्यांनाही पैसे द्यावेत लागतात. असे बोलून वाद मिटवण्यासाठी दबाव टाकला.
त्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांचा एक माणूस माझ्या बंगल्यावर आला. त्या माणसाला मी एका सोनेरी रंगाच्या पिशवीत पाच लाख रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद केले असून, उर्वरित २० लाख दुसऱ्या दिवशी देतो असे सांगितले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा उपलब्ध असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हिललाईन पोलिसानी भारतीय दंड संहिता कलम ३०८ (३ ) ३०८ (५) ३०८ (४) ३५१ (२) ३५२ ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप करीत आहेत.