अखेर अंबरनाथमध्ये बेकायदेशीर रिक्षा चालकांवर कारवाई सुरू
By पंकज पाटील | Published: January 11, 2024 06:42 PM2024-01-11T18:42:12+5:302024-01-11T18:42:23+5:30
स्क्रॅप रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर यापुढे देखील कारवाई करत राहावी अशी मागणी रिक्षा संघटनेने केले आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील बेकायदेशीर रिक्षा चालवणाऱ्या व कारवाई होत नसल्यामुळे रिक्षा संघटना आक्रमक झाली होती या बेकायदेशीर रिक्षाच्या विरोधात अंबरनाथ बंदची हाक देण्यात आली होती अखेर अधिकाऱ्यांनी आजपासून या रिक्षा चालकांवर कारवाई सुरू केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
स्क्रॅप रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर यापुढे देखील कारवाई करत राहावी अशी मागणी रिक्षा संघटनेने केले आहे. अंबरनाथ शहरातील अनधिकृत रिक्षा चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गुरुवारी अंबरनाथ वाहतूक विभाग आणि कल्याण परिवहन विभागाने अनधिकृत रिक्षाचालकांवर संयुक्त कारवाई केली. अनधिकृत रिक्षा चालकांमुळे परवानाधारक रिक्षाचालकांना त्रास होत असल्याने वाहतूक विभागाने अनधिकृत रिक्षा आणि चालकांवर कायमस्वरूपी कारवाई करावी या मागणीसाठी जोशीकाका रिक्षा चालक-मालक संघटनेचे शहर अध्यक्ष मिलिंद पाटील गुरुवारपासून रिक्षा बंदची हाक दिली होती. त्यामुळे रिक्षा चालकांच्या बेमुदत रिक्षा बंद आंदोलनाच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेऊन अंबरनाथ वाहतूक विभागाणे बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस धडक कारवाई केली.
त्याचबरोबर कल्याण परिवहन विभागाने देखील संयुक्त कारवाई दरम्यान 18 ते 20 वाहनचालकांवर कारवाई केल्याचे कल्याण परिवहन विभागाचे अधिकारी सचिन आयरे यांनी सांगितले. अंबरनाथ वाहतूक विभागाने दोन दिवसात 20 रिक्षांवर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल 20,000 रुपये दंड वसूल केल्याची माहिती अंबरनाथ वाहतूक विभागाचे अधिकारी गणेश पाटोळे यांनी दिली. शहरात साईट भाडा मारणारे बेकायदेशीर रिक्षा चालकांमुळे प्रामाणिक रिक्षा चालकांना त्रास सहन करावा लागत असल्याने रिक्षा संघटनाच या अनधिकृत रिक्षा चालकांच्या विरोधात उभी राहिली होती. अखेर रिक्षा संघटनेच्या या भूमिकेनंतर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना जाग आली आहे.