अखेर पावसाच्या विश्रांतीनंतर उल्हासनगरातील रस्ते दुरुस्तीला मिळाला मुहूर्त
By सदानंद नाईक | Updated: September 30, 2023 19:16 IST2023-09-30T19:15:59+5:302023-09-30T19:16:18+5:30
उल्हासनगरातील बहुतांश बाप्पांचे आगमन व विसर्जन खड्डेमय रस्त्यांवरून

अखेर पावसाच्या विश्रांतीनंतर उल्हासनगरातील रस्ते दुरुस्तीला मिळाला मुहूर्त
सदानंद नाईक, उल्हासनगर: बाप्पाचे आगमन व विसर्जन असताना खड्डयातील रस्त्यातून आलेले वाईट अनुभव पाहता गणेश भक्तांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अखेर पावसाने विश्रांती घेताच मिक्स सिमेंट काँक्रीटकॅच्या साहित्याने, रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. उल्हासनगरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाले असून बाप्पांचे आगमन व विसर्जन खड्डेमय रस्त्यातून झाले.
पावसाची संततधार असल्याने, रस्त्यातील खड्डे भरण्यास अडथळे आल्याची माहिती शहर अभियंता संदिप जाधव यांनी दिली. गणेशोत्सव दरम्यान काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले. मात्र संततधार पावसाने डांबरी रस्ते वाहून गेल्याचे चित्र शहरात होते. छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलावरील खड्डे पावसाळ्याच्या तीन महिन्यात तीन पेक्षा जास्त वेळा भरण्यात आले होते. शनिवारी दुपारी पुन्हा उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यात आले.
कॅम्प नं-४, गुरुनानक शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डे झाल्याने, नागरिक, मुले व दुचाकी वाहने पडून अनेक जण जखमी झाले. अखेर रिक्षाचालक अशोक शेनदाने यांनी रस्त्यातील खड्डे भरले. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, शनिवारी रस्त्यातील खड्डे भरल्याची माहिती समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी दिली. शहरातील पवई चौक ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन, हिराघाट, फॉरवर्ड लाईन ते मध्यवर्ती रुग्णालय, शांतीनगर ते डॉल्फिन रस्ता, व्हीनस चौक ते एसएसटी कॉलेज, लालचक्की ते व्हीनस चौक, कुर्ला कॅम्प रस्ता, कैलास कॉलनी रस्ता, नेताजी चौक ते तहसील कार्यालय रस्ता आदींसह अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली आहे. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे न भरल्याने, रस्ते खड्डेमय झाले आहे.
चौकट
रस्त्यातील खड्डे होणार चकाचक
पावसाने विश्रांती घेतल्यास एका आठवड्यात शहरातील रस्ते चकाचक होणार असल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली. तसेच एमएमआरडीएने मंजूर केलेल्या रस्त्याच्या कामालाही सुरवात होण्याचे संकेत शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिले आहे.