अखेर विरोधी पक्ष नेतेपदी सेनेच्या राजू भोईर यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 04:28 PM2018-02-21T16:28:33+5:302018-02-21T16:29:03+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेत विरोधी पक्षांतील जास्त सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला अखेर बहुप्रतिक्षेनंतर विरोधी पक्ष नेतेपद आले. महापौर डिंपल मेहता यांनी सेनेच्या राजू भोईर यांची नियुक्ती केल्याचे मंगळवारच्या महासभेत जाहीर केले.
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेत विरोधी पक्षांतील जास्त सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला अखेर बहुप्रतिक्षेनंतर विरोधी पक्ष नेतेपद आले. महापौर डिंपल मेहता यांनी सेनेच्या राजू भोईर यांची नियुक्ती केल्याचे मंगळवारच्या महासभेत जाहीर केले. या नेत्यासाठी पालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील दालनच मिळावे, यासाठी आक्रमक झालेल्या सेनेची मात्र प्रशासनाने बोळवण करुन आयुक्त बी. जी. पवार यांनी पहिल्या मजल्यावर दालन उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले.
विरोधी पक्षातील क्रमांक एकचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेच्या पदरी विरोधी पक्ष नेता पद आले असले तरी सत्ताधारी भाजपाचे आ. नरेंद्र मेहता यांच्या निर्देशानुसार ते रोखून धरण्यात आले होते. या पदावर सेनेचे राजू भोईर हे दावेदार ठरल्याने त्यांना या पदापासून वंचितच ठेवावे, असा प्रयत्न भाजपाने वेळोवेळी केला. यामागे भोईर यांच्या जमीन संपादनाचा मुद्दा असल्याचे सांगितले जात असले तरी भोईर यांना त्यावर विराजमान न करण्याचा डाव भाजपाकडून खेळला जात होता. भाजपाने लटकत ठेवलेल्या या पदावरील नियुक्तीचा मुद्दा सेनेने प्रतिष्ठेचा करुन अनेकदा आंदोलन छेडले. परंतु, त्यात सेनेची आक्रमकता दिसून येत नसल्याने भाजपाने त्यांची सतत बोळवण सुरु ठेवली. त्यातच या नेत्याचे दालन सुरुवातीपासून पालिका मुख्यालयातील दुस-या मजल्यावर असताना ते थेट तळमजल्यावर नेण्याची योजना सत्ताधाऱ्यांनी आखली. त्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच जागी झालेल्या सेनेने त्या नेत्याचे दालन दुसऱ्या मजल्यावरच ठेवावे, असा हट्टाहास सुरु केला. त्यासाठी देखील सेनेने सतत आंदोलन छेडून ते दालन खुले करुन त्याचा अनौपचारिकपणे ताबाही घेतला. मात्र प्रशासनाने त्या दालनाला त्वरित सील ठोकून सेनेचा दालन मिळविण्याचा प्रयत्न हाणून पाडला. विरोधी पक्ष नेता पदावरील नियुक्तीसह दालनाच्या अस्तित्वाच्या भाजपा संकटापुढे सेनेच्या आक्रमकतेचा पारा ढासळू लागल्याचे लक्षात येताच सत्ताधाऱ्यांनी ऐन शिवजयंतीच्या दिवशी सेनेला झटका दिला. दुसऱ्या मजल्यावरील विरोधी पक्ष नेत्याचे दालन लगतच्याच स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांच्या दालनात विलिन केले. या दोन्ही दालनाच्या दरम्यान असलेले पार्टीशन तोडून त्याच्या नुतनीकरणाला प्रशासनाच्या माध्यमातून दुरुस्तीला देखील सुरुवात करण्यात आली. त्याचे वृत्त लोकमतने २० फेब्रुवारीच्या हॅलो ठाणे पुरवणीत प्रसिद्ध केले होते. त्यामुळे सेनेने २१ फ्रब्रुवारीच्या महासभेत विरोधी पक्ष नेता पदावरील नियुक्तीसह दालनाचा तोडगा काढण्याचे निश्चित केले. त्यानुसार सेनेच्या सदस्यांनी महापौरांकडे त्या पदावरील नियुक्तीच्या मागणीचा रेटा लावताच महापौरांनी देखील ते आणखी ताणून न धरता भोईर यांची विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले. मात्र दालनाचा प्रश्न उपस्थित होताच आयुक्तांनी तळमजल्याऐवजी पहिल्या मजल्यावर दालन उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले. यावर सेनेने सुद्धा नमते घेत पहिल्या मजल्यावरील दालनाला पसंती दिली. या दालनाची व्यवस्था पहिल्या मजल्यावरील जाहिरात अथवा किटकजन्य रोग नियंत्रण विभागात होण्याची शक्यता पालिकेच्या सुत्रांकडून वर्तविली जात आहे.