अखेर रायलादेवी तलाव सुशोभीकरणाला मुहूर्त सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:25 PM2019-09-21T23:25:44+5:302019-09-21T23:25:51+5:30
१० कोटी रुपयांची तरतूद; आचारसंहितेआधी उरकले भूमिपूजन
ठाणे : एमआयडीसी आणि ठाणे महापालिका यांच्यातील हस्तांतरणाच्या प्रक्रियेवरून मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या रायलादेवी तलावाच्या संवर्धनासाठी गेल्या वर्षी मुहूर्त मिळाला होता. मात्र, बजेट न मिळाल्यामुळे तब्बल वर्षभर संवर्धनाचे काम रखडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याच्या संवर्धनाचे भूमिपूजन करण्यात आले. निविदा आणि बजेटची तरतूद करण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागल्याचा दावा प्रशासनाने केला असून या सर्व कामांसाठी बजेटची तरतूद वाढवून ती १० कोटी रु पये केली आहे.
रायलादेवी तलावाचे शुद्धीकरण करण्याबरोबरच आजूबाजूच्या परिसराचादेखील कायापालट या संपूर्ण कामांमध्ये करण्यात येणार
असून आचारसंहितेनंतर या कामाला सुरु वात होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मागील वर्षी संवर्धन करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. यासाठी ठाणे महापालिका प्रशसानाने आठ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. तलावाच्या संवर्धनाच्या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता वाढवण्याबरोबरच तलावाच्या पाण्याची गळतीदेखील थांबवण्यात आली होती. विशेष म्हणजे, तलावाचे संवर्धन करताना वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी या तलावाभोवती येण्यासाठी तशा प्रकारची सुविधा करण्याचीदेखील घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती. मात्र, ती वर्षभर कागदावरच राहिली असून वर्षभरानंतर आता या कामाला मुहूर्त मिळाला आहे.
ही कामे करणार
याअंतर्गत तलावाचा संपूर्ण गाळ काढण्यात येणार आहे. तलावाभोवती टो वॉल बांधण्यात येणार आहे, त्यानंतर पिचिंगसह पाथवेदेखील तयार करण्यात येणार आहे. जॉगिंग ट्रॅक, छोटे अॅम्पी थिएटर तयार करण्यात येणार असून एकूण १० कोटी या कामासाठी खर्च करण्यात येणार आहे. नऊ महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. आता पाण्याची पातळी जास्त असल्याने गाळ काढणे कठीण असल्याने पाणी कमी झाल्यानंतर गाळ काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.