अखेर २३७० कोटींच्या अंदाजपत्रकास आयुक्तांचा हिरवा कंदील
By admin | Published: September 5, 2015 02:55 AM2015-09-05T02:55:55+5:302015-09-05T02:55:55+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पाच महिन्यांत पालिकेच्या उत्पन्नात १४६ कोटींची वाढ झाली असली तरी एलबीटी आणि शहरविकास विभागामुळे सुमारे ३०० कोटींची तूट पडत असल्यानेच
ठाणे : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पाच महिन्यांत पालिकेच्या उत्पन्नात १४६ कोटींची वाढ झाली असली तरी एलबीटी आणि शहरविकास विभागामुळे सुमारे ३०० कोटींची तूट पडत असल्यानेच या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी कशी करायची, असा पेच निर्माण झाला होता. अखेर, टप्प्याटप्प्याने उत्पन्न आणि खर्चाची सांगड घालून शुक्रवारी २३७० कोटींच्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करण्यास पालिका आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविला आहे. विशेष म्हणजे नगरसेवकांना प्रभाग, नगरसेवक, मागास आणि महापौर असा २४० कोटींचा निधी खर्चासाठी मिळणार आहे. त्यात कोणत्याही प्रकारची कपात न करता ती इतर कामांत करून आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना खूश केले आहे.
मागील महासभेत अंदाजपत्रकाची अंमलबजावणी न झाल्याच्या मुद्यावरून गदारोळ झाला होता. सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरून त्याची अंमलबजावणी करा, अशी मागणी केली होती. त्यानुसार, महापौर संजय मोरे यांनीदेखील एका आठवड्यात त्यावर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. अखेर, शुक्रवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या अंदाजपत्रकाला हिरवा कंदील दाखविला. परंतु, हे करीत असताना एलबीटीमुळे १५० कोटी आणि शहरविकास विभागातही सुमारे १५० कोटींची तूट येत असल्याने ती कशी भरून काढायची, असा सवालही प्रशासनाला आता भेडसावू लागला आहे. सुदैवाने पाणी दरवाढीसह इतर दरवाढींचे प्रस्ताव मंजूर झाल्याने त्यातील काही हिस्सा यात वर्ग होऊ शकणार आहे. तरीही, २०० कोटींची तूट राहणार असल्याने ती भरून काढण्यासाठी सर्व विभागांचा अभ्यास केला असून कोणत्या विभागाकडून किती उत्पन्न मिळू शकते, त्यानुसार खर्च किती केला जाऊ शकतो, याचा अभ्यास करून पुढील सात महिन्यांत किती उत्पन्न मिळू शकते, याचाही अंदाज घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसारच खर्च केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, भविष्यात उत्पन्न अधिक आणि खर्च कमी करण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. मागील वर्षी भांडवली खर्चावर १४५० कोटींचा खर्च झाला होता. तर, जेएनएनयूआरएमवर ६५० कोटींचा खर्च झाला होता.