अखेर स्थायी समिती सभापतीपदाची निवडणुक लागली, सभापतीपदासाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:02 PM2018-05-08T16:02:32+5:302018-05-08T16:02:32+5:30

अखेर सुमारे दिड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणुक लागली आहे. सभापतीपदासाठी शिवसेनेकडून तीन नावे आघाडीवर आले आहेत. परंतु सभापतीपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसची भुमिका निर्णायक मानली जात आहे.

Finally, the election of standing committee chairman was held | अखेर स्थायी समिती सभापतीपदाची निवडणुक लागली, सभापतीपदासाठी रस्सीखेच

अखेर स्थायी समिती सभापतीपदाची निवडणुक लागली, सभापतीपदासाठी रस्सीखेच

Next
ठळक मुद्दे११ मे रोजी अर्ज भरले जाणारसभापती आमचाच शिवसेनेचा दावा

ठाणे - अखेर एक वर्षाच्या प्रर्दीघ प्रतिक्षेनंतर अखेर येत्या १६ मे रोजी ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणुक लागली आहे. त्यासाठी ११ मे रोजी अर्ज भरले जाणार आहेत. या निवडणुकीत आता कॉंग्रेसची भुमिका महत्वाची ठरणार असली तरी देखील सभापती हा आमचाच होईल असा दावा शिवसेनेने केला आहे. त्यामुळेच आता सभापतीपदासाठी शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. परंतु सभापतीपद हे वागळे पट्याकडेच जाईल अशी चर्चा जोरात सुरु आहे. त्यातही या निवडणुकीत भाजपा कोणाच्या बाजूने झुकणार की तटस्थ राहणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
                 मागील वर्षी शिवसेनेने कॉंग्रेसला हाताशी धरुन स्थायी समितीची गणिते आखली होती. त्यानुसार कॉंग्रेसचा एक सदस्य हा त्यांनी स्थायी समितीत घेतला होता. परंतु पक्षाला विश्वासात न घेता, कॉंग्रेसचे यासिन कुरेशी यांनी शिवसेनेला पाठींबा दिल्याने इतर दोन नगरसेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. अखेर कॉंग्रेसने पाठींबा देण्यास नकार दिला. परंतु असे असतांना आणि स्थायीची सुनावणी न्यायालयात प्रलंबित असतांना मागील वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या महासभेत पिठासीन अधिकाऱ्यांनी स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली होती. याच्या विरोधात राष्ट्रवादीने पुन्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे मागीला दिड वर्षापासून स्थायी समिती गठीत होऊच शकली नाही. त्यात आता नव्या आर्थिक वर्षात शिवसेनेने स्थायी समिती गठीत करण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. परंतु यासिन कुरेशी यांची कॉंग्रेसच्या गटनेते पदावरुन उचलबांगडी झाल्याने त्यांच्या या हालचालींना पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु कुरेशी हे शिवसेनेच्या बाजूनेच मतदान करतील असा दावा थेट शिवसेनेने केला आहे. दुसरीकडे ही निवडणुक योग्य पध्दतीने असेल तर आम्ही सहकार्य करु, परंतु नियमबाह्य असेल तर कायदेशीर मार्गाने याबाबत दाद मागू असा नारा कॉंग्रेसने दिला आहे. त्यामुळे सभापतीपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसची भुमिका महत्वाची मानली जाणार आहे. कॉंग्रेसचे सदस्य गैरहजर जरी राहिले तरी शिवसेनेच्या बाजूने झुकते माप असणार आहे. एकूणच हजर न राहिल्यास शिवसेनेची बाजू आणखी भक्कम होणार आहे.
अशी गणिते देखील बदलण्याची शक्यता
सध्या शिवसेनेचे स्थायी समितीमध्ये आठ सदस्य कॉंग्रेसचा एक, राष्ट्रवादीचे चार आणि भाजपाचे तीन सदस्य आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या एका सदस्याने राष्ट्रवादीला टाळी दिली आणि राष्ट्रवादीने भाजपाला हाताशी घेतल्यास तर शिवसेना ८ आणि राष्ट्रवादी , कॉंग्रेस आणि भाजपा मिळून आठ सदस्य होणार आहेत. त्यामुळे असे जर झाले तर मात्र स्थायीचा निकाल काही वेगळा असू शकतो.
दरम्यान आता यापूर्वी महासभेने जी नावे निश्चित केली होती तीच नावे कायम ठेवत येत्या १६ मे रोजी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणुक लावण्यात आली आहे. त्यानुसार सभापतीपदासाठीचे अर्ज ११ मे रोजी भरले जाणार आहेत. सभापतीपदासाठी अनेक इच्छुक...
स्थायी समितीची गणिते जुळविण्याच्या हालाचाली सुरु असतांनाच, शिवसेनेतून राम रेपाळे, संजय भोईर, आणि नरेश मणेरा यांची नावे आता आघाडीवर आली आहेत. यामध्ये दोघा निष्ठावतांचा समावेश असून भोईर हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाले आहेत. परंतु त्यांना श्रेष्ठींनी शब्द दिला असल्याने तो शब्द पाळला जाणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. असे असले तरी आता पहिल्या वर्षाच्या संधी वागळे पट्याला देण्याचे शिवसेनेने निश्चित केले आहे. त्यामुळे भोईरांना पुन्हा वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
यापूर्वी स्थायी समितीसाठी जाहीर झालेली नावे...
शिवसेना - नरेश म्हस्के, नरेश मणेरा, संजय भोईर, राम रेपाळे, शैलेश पाटील, गुरमित सिंग श्यान, विमल भोईर, मालती पाटील आणि कॉंग्रेसचे यासिन कुरेशी
राष्ट्रवादी  - नजीब मुल्ला, विश्वनाथ भगत, शानु पठाण, सिराज डोंगरे
बीजेपी - मनोहर डुंबरे, नारायण पवार आणि मुकेश मोकाशी


 

Web Title: Finally, the election of standing committee chairman was held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.