अखेर सेव्हन इलेव्हन हॉटेल कंपनीवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:30+5:302021-03-14T04:35:30+5:30
मीरा रोड : भाईंदर मधील रकवी कुटुंबीयांची मीरा रोडच्या कनकिया भागात सेव्हन इलेव्हन क्लबजवळ हक्काची जमीन आहे. या जमिनीवर ...
मीरा रोड : भाईंदर मधील रकवी कुटुंबीयांची मीरा रोडच्या कनकिया भागात सेव्हन इलेव्हन क्लबजवळ हक्काची जमीन आहे. या जमिनीवर सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनीने बळजबरी कुंपण घालून आतमध्ये काही झोपड्या उभारल्या होत्या. हा प्रकार समजल्यावर मे २०१९ पासून रकवी कुटुंब मीरा रोड पोलीस ठाणे आणि महापालिकेकडे सतत तक्रारी करत होत्या. परंतु पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. अखेर भूमिपुत्र असलेल्या ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या फिर्यादीवरून तब्बल २२ महिन्यांनी मीरा रोड पोलिसांनी सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनी, संचालक व इतरांवर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीचे मुख्य भागधारक माजी आमदार नरेंद्र मेहतांसह संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. २४ नोव्हेंबर २०२० रोजी मीरा रोड पोलिसांनी ६८ वर्षीय अमोल रकवी यांचा जबाब नोंदवून घेतला होता. दरम्यान, पोलिसांनी कंपनीचे संचालक संजय सुर्वे यांना बोलावून जागेस घातलेले कुंपण व अतिक्रमण हटवण्यास सांगितले होते परंतु कंपनीने काहीच केले नाही. अमोलसह गजेंद्र रकवी, सचिन पाटील , महेश राऊत आदींनी पाठपुरावा सुरू ठेवला. पोलीस आयुक्तांना भेटून त्यांच्याकडे तक्रार केली. तब्बल २२ महिन्यांनी पोलिसांनी रकवी यांची फिर्याद शुक्रवारी घेतली. सेव्हन इलेव्हन संस्था, संचालक संजय सुर्वे व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
--------------------------------------------
याआधीही टीडीआर लाटण्याचा प्रयत्न
रकवी म्हणाले की, पोलीस आता तरी मेहतांसह कंपनीचे त्यांचे अन्य भागधारक, संचालक आणि संबंधितांवर कठोर कारवाई करून कायद्याची जाणीव करून देतील अशी अपेक्षा आहे. या आधीही मेहतांच्या कंपनीने आमच्या जागेचा टीडीआर लाटण्याचा प्रयत्न केला होता. तो आम्ही हाणून पडला होता . तर आणखी एका भूमिपुत्राच्या सुमारे ३७ जमिनीही बनावट स्वाक्षरी व बनावट मुखत्यारपत्राद्वारे विकल्याची तक्रारही गंभीर असल्याचे रकवी म्हणाले.