अखेर अर्थसंकल्प मंजुरीसाठी बोलावली महासभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:22 AM2019-07-26T00:22:01+5:302019-07-26T00:22:11+5:30

३०/३१ जुलैचा मुहूर्त : विधानसभा निवडणुकीसाठी दाखवणार घोषणांचे गाजर

Finally, the General Assembly called for budget approval | अखेर अर्थसंकल्प मंजुरीसाठी बोलावली महासभा

अखेर अर्थसंकल्प मंजुरीसाठी बोलावली महासभा

Next

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी २० फेब्रुवारी रोजी ३८६१.८८ कोटींचा मूळ अर्थसंकल्प सादर केल्यानंतर स्थायी समितीचे गणित विस्कटल्याने त्यावर चर्चाच अद्यापपर्यंत होऊ शकलेली नाही. अर्थसंकल्प मंजूर होत नसल्याने नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा निधी तसेच इतर कामांवर गदा येत होती. स्थायी समिती गठीत नसल्याने अर्थसंकल्पावरील चर्चा पुन्हा एकदा थेट महासभेत होणार आहे. त्यानुसार, येत्या ३० आणि ३१ जुलै रोजी ही चर्चा होणार आहे. येत्या महिनाभरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजत असल्याने या मूळ अंदाजपत्रकात आणखी कोणती नवी गाजरे सत्ताधारी दाखवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड तसेच मुंब्रा, दिवा आणि नवीन ठाण्याच्या विकासासाठी विशेष भर दिलेला आहे. तसेच हॅप्पीनेस इंडेक्स वाढवण्यासाठीसुद्धा विशेष प्रकल्पांची घोषणा केली होती. त्यानंतर या अर्थसंकल्पावर स्थायी समितीमध्ये चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु, तिची गणिते पुन्हा बिघडल्याने आजघडीलासुद्धा ती गठीत होऊ शकलेली नाही. शिवसेनेच्या हाती एकहाती सत्ता असतानाही स्थायी समितीसाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अनेक प्रस्ताव थेट महासभेत मंजुरीसाठी जात असल्याचे दिसत आहे. या प्रस्तावांवरूनच महासभेत गदारोळ होत आहे. दुसरीकडे अर्थसंकल्प मंजूर न झाल्याने आयुक्तांच्या बजेटनुसारच शहरातील कामे सुरू आहेत. यामुळे नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा निधीसह इतर महत्त्वाचे बजेटही मिळत नसल्याने नगरसेवकही हैराण झाले आहेत.

नव्या योजनांचा समावेश होणार
नुकत्याच झालेल्या महासभेत सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी स्थायी समिती गठीत नसल्याने आणि नगरसेवकांची कामेसुद्धा प्रभागात होत नसल्याने अर्थसंकल्पावर थेट महासभेत चर्चा व्हावी, या उद्देशाने अर्थसंकल्पीय महासभा घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार, ३० आणि ३१ जुलै रोजी ही अर्थसंकल्पीय महासभा घेण्यात येणार आहे. तीत सत्ताधाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बजेटमध्ये वाढ करण्याचे जवळजवळ निश्चित केले आहे. शिवाय, इतरही काही महत्त्वाच्या योजना अर्थसंकल्पात समाविष्ट केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ठाणेकरांना या अर्थसंकल्पातून नवे काय मिळणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

Web Title: Finally, the General Assembly called for budget approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.