अखेर आक्षेपार्ह वक्तव्य करणारा कालीचरण ठाणे पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 09:33 PM2022-01-20T21:33:16+5:302022-01-20T21:36:42+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारा तथाकथित संत कालीचरण याला अखेर ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी बुधवारी (दि. १९) अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारा तथाकथित संत कालीचरण याला अखेर ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी बुधवारी (दि. १९) अटक केली आहे. त्याला रायपूरच्या कारागृहातून ताब्यात घेतल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी गुरुवारी दिली.
रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेमध्ये कालीचरण याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका करून नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण केले होते. त्यामुळे सपूर्ण देशभर संताप व्यक्त करण्यात आला. गांधींवरील टीकेने त्याने संपूर्ण देशवासीयांचाही अवमान केल्याचा आरोप करून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे तसेच शेकडो कार्यकर्त्यांसह नौपाडा पोलीस ठाण्यात २९ डिसेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल केला. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, रामचंद्र वळतकर आणि अविनाश सोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगम पाटील, हवालदार शिवाजी बोऱ्हाडे, सचिन म्हामुणकर, नंदकुमार कुरकुटे, मुख्यालयाचे योगेश मासरे, पंढरीनाथ सांगळे, कूपर जाधव, विजय सणस आणि योगेंद्रनाथ रणवीर, आदींच्या पथकाने तब्बल एक हजार किलोमीटरचे अंतर कापून छत्तीसगढ राज्यातील रायपूर कारागृहातून १९ जानेवारी रोजी कालीचरणला ताब्यात घेतले.