अखेर पालिकेला मिळाला विरोधी पक्षनेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:43 AM2018-02-22T00:43:54+5:302018-02-22T00:43:58+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेतील बहुप्रतीक्षेत विरोधी पक्षनेत्याची घोषणा मंगळवारच्या महासभेत महापौर डिंपल मेहता यांनी केल्याने शिवसेनेने सुटकेचा निश्वास टाकला
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेतील बहुप्रतीक्षेत विरोधी पक्षनेत्याची घोषणा मंगळवारच्या महासभेत महापौर डिंपल मेहता यांनी केल्याने शिवसेनेने सुटकेचा निश्वास टाकला. राजू भोईर यांच्या गळ््यात नेतेपद पडले असले तरी दालनावरून मात्र प्रशासनाने बोळवण केली आहे. दुसºया ऐवजी पहिल्या मजल्यावर दालन देण्याचे आयुक्त बी.जी.पवार यांनी सांगितले.
शिवसेनेच्या पदरी विरोधी पक्षनेते पद आले असले तरी आमदार नरेंद्र मेहता यांच्या निर्देशानुसार ते रोखून धरले होते. या पदावर सेनेचे भोईर हे दावेदार ठरल्याने त्यांना या पदापासून वंचितच ठेवावे, असा प्रयत्न भाजपाने वेळोवेळी केला. यामागे भोईर यांच्या जमीन संपादनाचा मुद्दा असल्याचे सांगितले जात असले तरी भोईर यांना त्यावर विराजमान न करण्याचा डाव भाजापाकडून खेळला जात होता.
भाजपाने लटकत ठेवलेल्या या पदावरील नियुक्तीचा मुद्दा सेनेने प्रतिष्ठेचा करून अनेकदा आंदोलन छेडले. परंतु, त्यात सेनेची आक्रमकता दिसून येत नसल्याने भाजपाने त्यांची सतत बोळवण सुरू ठेवली.
त्यातच या नेत्याचे दालन सुरूवातीपासून पालिका मुख्यालयातील दुसºया मजल्यावर असताना ते थेट तळमजल्यावर नेण्याची योजना सत्ताधाºयांनी आखली. त्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच जागी झालेल्या सेनेने त्या नेत्याचे दालन दुसºया मजल्यावरच ठेवावे, असा अट्टाहास सुरू केला. त्यासाठी देखील सेनेने सतत आंदोलन करून ते दालन खुले करुन त्याचा अनौपचारिकपणे ताबाही घेतला. मात्र प्रशासनाने त्या दालनाला सील ठोकून सेनेचा दालन मिळवण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
सेनेच्या आक्रमकतेचा पारा चढत असल्याचे लक्षात येताच सत्ताधाºयांनी ऐन शिवजयंतीच्या दिवशी सेनेला झटका दिला. दुसºया मजल्यावरील विरोधी पक्षनेत्याचे दालन स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांच्या दालनात विलीन केले.
या दोन्ही दालनाच्या दरम्यान असलेले पार्टीशन तोडून त्याच्या नूतनीकरणाला सुरूवात करण्यात आली. त्याचे वृत्त ‘लोकमत’ने २० फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केले. त्यामुळे सेनेने मंगळवारच्या महासभेत विरोधी पक्षनेता पदावरील नियुक्तीसह दालनाचा तोडगा काढण्याचे निश्चित केले.
त्यानुसार सेनेच्या सदस्यांनी महापौरांकडे त्या पदावरील नियुक्तीच्या मागणीचा रेटा लावताच महापौरांनीही ते आणखी ताणून न धरता भोईर यांच्या नावाची घोषणा केली. यामुळे सेनेने सुटकेचा निश्वास टाकला.