अखेर मीरा भाईंदरकरांचे स्वप्न साकार; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी उद्धाटनाचा बेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2022 06:37 PM2022-06-16T18:37:40+5:302022-06-16T18:37:59+5:30
शहराच्या पहिल्या नाट्यगृहाचे काम पूर्ण, तळ अधिक ४ मजल्याच्या इमारतीत १ हजार आसनी व ३०० आसनी अशी २ नाट्यगृह आहेत
मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील नाट्य रसिकांचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न अखेर लवकरच साकार होणार आहे . शहरातील पहिल्या नाट्यगृहाचे काम जवळपास पूर्ण झाले असून मुख्ययमंत्री यांच्या वाढदिवशी म्हणजेच २७ जुलै रोजी नाट्यगृहाच्या उदघाटनाची घंटा वाजण्याची शक्यता आहे .
मीरा भाईंदर शहर झपाट्याने वाढत असले तरी शहरात एकही नाट्यगृह नाही . मीरारोडच्या शिवार उद्यान येथील मध्यवर्ती भागात नाट्यगृहासाठी असलेल्या एकमेव आरक्षणाला विकासकाच्या घश्यात घालण्याचा प्रताप काही राजकारणी नगरसेवक व प्रशासनाने केल्याने १९९५ साली आरक्षण पडून देखील त्या जागी २७ वर्षांनी देखील आरक्षणाची जागा पालिका घेऊ शकलेली नाही .
परंतु शहरातल्या कलासक्त नागरिकांची नाट्यगृहाची गरज पाहता आमदार प्रताप सरनाईक यांनी काशीमीरा महामार्गा लगत असलेल्या सुमारे ५ हजार २५५ चौमी. च्या सुविधा भूखंडावर नाट्यगृह उभारण्याची मागणी करत त्याला मंजुरी मिळवून घेतली होती . त्या नंतर सदर नाट्यगृहाच्या बांधकामा साठी महापालिकेच्या निधीवर अवलंबून न राहता टीडीआर च्या माध्यमातून विकासका कडून सदर इमारतीचे बांधकाम करून घेण्यात आले . इमारतीचे बांधकाम झाले पण अंतर्गत फर्निचर , सजावट आदींवर होणारा खर्च सुद्धा शासना कडून मान्यता घेऊन विकासका कडूनच टीडीआरच्या माध्यमातून करून घेण्यात आला आहे . त्यामुळे महापालिकेचा करोडोंचा निधी वाचला आहे .
तळ अधिक ४ मजल्याच्या इमारतीत १ हजार आसनी व ३०० आसनी अशी २ नाट्यगृह आहेत. नाट्यगृहाचे संपूर्ण बांधकाम हे १ लाख १० हजार फुटांचे आहे. तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर आर्ट गॅलरी तर बेसमेंट मध्ये व तळमजल्यावर पार्किंगची सुविधा आहे. वेटिंग हॉल , कॅफेटेरिया , व्हीआयपी रूम , ग्रीन रूम अशा सुविधा असून ६ लिफ्ट नाट्यगृहात आहेत. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या नाट्यगृहाची ध्वनी यंत्रणा आधुनिक पद्धतीची असून मुंबईतील मोठ्या कंपनीने साउंड सिस्टीम , प्रकाश व्यवस्था केली आहे. तारांकित हॉटेल सारख्या सुविधा ह्या मध्ये असून मीरा भाईंदर सह दहिसर ते विरारपर्यंतच्या नाट्य रसिकांसाठी हे नाट्यगृह पर्वणी ठरणार आहे .
गुरुवारी ह्या नाट्यगृह इमारतीची पाहणी आ . सरनाईकी यांच्या सह पालिका आयुक्त दिलीप ढोले आदींनी केली . या वेळी नाट्यगृहाचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसा दिनी म्हणजेच २७ जुलै रोजी करण्यावर चर्चा झाली . कारण ह्या नाट्यगृहाचे भूमिपूजन २३ ऑगस्ट २०१५ रोजी उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच झाले होते.
सुमारे १५० कोटींचा खर्च ह्या नाट्यगृह इमारतीसाठी झाला आहे . रंगमंच आता नाट्य प्रयोगांसाठी सज्ज झाले आहे . नाट्यकलावंत , नाट्य क्षेत्रातील अनुभवींनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली आहे . शहराला आकर्षक , सुसज्ज नाट्यगृह इमारत मिळाली असून जनतेचे स्वप्न पूर्णत्वास आणू शकलो याचा आनंद मोठा आहे. शासनाने टीडीआरच्या माध्यमातून खर्च करण्यास मंजुरी दिल्याने पालिकेचा पैसा वाचला आहे. - प्रताप सरनाईक (आमदार)