अखेर बहुप्रतिक्षित पत्रीपूल वाहतुकीसाठी खुला; भाजपनं घातला नामांतराचा घाट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 02:33 PM2021-01-25T14:33:55+5:302021-01-25T14:42:38+5:30
काही दिवसांतच कल्यान डोम्बिवली महानगर पालिकेची निवडणूक आहे. यामुळे मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठीच भाजपने हा पुलाच्या नामांतराचा घाट घातल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
कल्याण -कल्याण आणि डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या पत्री पुलाचे अखेर लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने यासाठी हिरवा कंदील दाखवला. यामुळे आता हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यावेळी आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते. यातच, आता या पुलाला भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न 'डॉ अब्दुल कलाम' यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.
काही दिवसांतच कल्यान डोम्बिवली महानगर पालिकेची निवडणूक आहे. यामुळे मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठीच भाजपने हा पुलाच्या नामांतराचा घाट घातल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पुलाच्या उद्घाटनापूर्वीच भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी उड्डाणपूल नामकरणासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदेंना यांना पत्र लिहिले आहे. यात पत्रीपुलाला दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
"भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम हे भारताच्या स्वयंपूर्ण क्षेपणास्त्र मोहिमेचे शिल्पकार होते, तसेच भारतीय युवा पिढीचे ते आजही आदर्श आहेत. खासकरून बालगोपाळांसोबत त्यांची विशेष मैत्री होती. कल्याण डोंबिवलीतील दहा हजार शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संपूर्ण जन गण मन कार्यक्रमास त्यांची उपस्थिती आजही आपल्या स्मरणात आहे. एका अर्थाने त्यांचे पदस्पर्श आपल्या कल्याण-डोंबिवली शहरांना लाभले. त्याची चिरंतन स्मृती राहावी म्हणूनच पत्रीपुलास 'भारतरत्न कलाम सेतू' असे नाव देण्याची भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमची मागणी आहे," असे आमदार चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. मात्र, आता चव्हाण यांच्या मागणीवर शिवसेना कशा प्रकारची भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाचे म्हणजे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असूनही या पुलाच्या लोकार्पण सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून कुणाचीही उपस्थीत नव्हती, अशी चर्चाही येथे सुरू आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले.