अखेर पारसिक टनेलवरील कचरा हटविण्यासाठी पालिकेला सापडला मुहुर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 04:18 PM2018-09-14T16:18:23+5:302018-09-14T16:20:15+5:30
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अखेर पारसिक टनेलवरील कचरा हटविण्यास सुरवात झाली आहे. येत्या आठ दिवसात हा परिसर कचरामुक्त करण्यात येणार असून भविष्यात येथे लहान मुलांसाठी उद्यान तयार करण्यात येणार आहे.
ठाणे - मागील कित्येक वर्षे पारसिक टनेलवर साचलेल्या कचऱ्याचे ढीग हटविण्याची मोहीम अखेर ठाणे महापालिकेने हाती घेतली आहे. या टनेलवरील कचरा पालिकेने जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर करुन काढण्यास सुरवात केली असून येत्या आठ दिवसात हा टनेल स्वच्छ झालेला दिसेल असा दावा पालिकेने केला आहे. तसेच वाघोबा आणि भास्कर नगर भागाच्या येथील मधील जागेत लहान मुलांसाठी एक उद्यानही येथे भविष्यात साकारले जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी दिली.
भास्कर नगर आणि वाघोबा नगरला जोडणारा पारसिक टनेल हा महत्वाचा दुवा ठरत आहे. या दोन्ही भागात झोपडपट्टींचे साम्राज्य अधिक आहे. याच झोपडपट्टी भागातून निर्माण होणारा कचरा हा पारसिक टनेलवर टाकला जात होता. मागील कित्येक वर्षापासून या टनेलच्या वरील बाजू कचऱ्याने भरलेली असायची. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्यही येथे पसरले होते. काही वेळेस किरकोळ आगीच्या घटनासुध्दा या ठिकाणी घडल्या होत्या. या कचऱ्याचा त्रास खालील बाजूने जाणाऱ्या रेल्वे सेवेवर सुध्दा होत होता.
त्यामुळेच येथील कचऱ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी स्थानिक नगरसेवक महेश साळवी आणि इतर नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाकडे वांरवार मागणी केली होती. तसेच विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनीसुध्दा पाठपुरावा केला होता. परंतु येथील कचरा हटविण्यासाठी साधे तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार नव्हते. आता पालिकेची समस्या सुटली असून जर्मन तंत्रज्ञानाचे मशिन पालिकेच्या ताफ्यात समाविष्ट झाले आहे. याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने १३ सप्टेंबर पासून येथील कचरा उचलण्यास सुरवात झाली आहे. टनेलवरील हा कचरा उचलल्यानंतर या भागात लहान मुलांसाठी एक उद्यान तयार करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच भास्कर नगर आणि वाघोबा नगर भागातील रहिवाशांना ये जा करणे सुध्दा सुसह्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या आठ दिवसात ही मोहीम पार पाडण्यासाठी उपायुक्त मनीष जोशी, बालाजी हळदेकर विशेष लक्ष ठेवून आहेत.