अखेर उल्हासनगर एमजेपीच्या जागेवर नामफलक; कोट्यावधीच्या जागेवर सनद काढल्याची अफवा
By सदानंद नाईक | Published: September 17, 2023 03:52 PM2023-09-17T15:52:13+5:302023-09-17T15:52:28+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-४, कुर्ला कँम्प, शिवमंदिर मुख्य रस्त्यालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे खुली जागा व त्यावर पडलेल्या अवस्थेत निवासस्थान आहेत
उल्हासनगर : शहर पूर्वेतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निवासस्थान व खुल्या जागेवरील नामफलक काढुन टाकून त्याजागी गेल्या काही वर्षापासून भूमाफिया भरणी करीत होते. जागृत नागरिकांच्या सतर्कतेमुळे एमजीपीने खुल्या जागेवर नामफलक लावले असून कोट्यवधींचा भूखंड हडप होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, कुर्ला कँम्प, शिवमंदिर मुख्य रस्त्यालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे खुली जागा व त्यावर पडलेल्या अवस्थेत निवासस्थान आहेत. या मोक्याच्या ठिकाणच्या जागेची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याने, भूमाफियांच्या जागेवर डोळा आहे. या भुखंडावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीचा भुखंड असा फलक होता. मात्र कालांतराने तो फलक गायब होऊन त्याजागेवर भरणी करण्यात आली. यामुळे खड्ड्याच्या स्वरूपात असलेल्या या भुखंडाची जागा रस्त्याच्या समान पातळीवर आली. खुल्या जागेवर टाकण्यात आलेला कचरा व डेब्रिज रस्त्यावर येऊ लागल्याने, भूखंड पुन्हा चर्चेत आला.
महापालिका व प्रांत कार्यालयाला हाताशी धरून जागेवर सनद काढल्याचे बोलले जात आहे. दरम्यान माजी उपमहापौर विनोद ठाकूर, काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह अन्य जणांनी एमजीपीच्या जागेबाबत आवाज उठविला आहे. मात्र खुल्या जागेवर अज्ञात व्यक्तीने डेब्रिजचा भरणा टाकण्याचे काम सुरू ठेवले. राष्ट्रलोक पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी आणि प्रहार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अँड. स्वप्निल पाटिल यांनी याविषयी आवाज उठवल्यानंतर, अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला जाग येऊन, त्यांनी जागेवर नामफलक लावला आहे. तसेच त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या आठवड्यात एमजीपी ठाणे कार्यालयाचे कार्यकारी अभियंता तन्मय कांबळे यांनी याठिकाणी भेट देऊन यावर झालेल्या अतिक्रमणाविरूद्ध आणि बोगस सनद प्रकरणात कारवाईचे संकेत दिले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जागा महापालिकेला?
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी गेल्या वर्षी मालमत्ता विभागाला एक पत्र देऊन शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागा अंतर्गत येणाऱ्या जागा व निवासस्थाने ताब्यात घेण्याचे सुचविले होते. प्राधिकरणाने त्यांच्या ताब्यातील खुली जागा व निवासस्थाने महापालिकेकडे हस्तांतरीत केली. त्याप्रमाणे कुर्ला कॅम्प रस्ता, नेताजी गार्डन जवळी निवासस्थान जागेसह इतर जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी होत आहे.