अखेर नेहरू मैदानातील डेब्रिज हटविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:35 AM2021-05-03T04:35:20+5:302021-05-03T04:35:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : पूर्वेतील नेहरू मैदानात डेब्रिजचे ढिगारे आणि कचऱ्याचा पसारा पाहता, ‘डोंबिवलीतील नेहरू मैदानाला डेब्रिज व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पूर्वेतील नेहरू मैदानात डेब्रिजचे ढिगारे आणि कचऱ्याचा पसारा पाहता, ‘डोंबिवलीतील नेहरू मैदानाला डेब्रिज व कचऱ्यामुळे आली अवकळा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ३० एप्रिलला वृत्त प्रकाशित केले होते. याची तत्काळ दखल घेत, केडीएमसीकडून मैदानातील डेब्रिज हटविण्यात आले आहे. दरम्यान, मैदानाची दैनंदिन साफसफाई व्हावी, अशी मागणी खेळाडूंकडून होत आहे.
सध्या नेहरू मैदानाची स्थिती कबुतरखाना अशी असताना, मैदानातील एका बाजूला मोठ्या प्रमाणावर डेब्रिजचे ढीग जमा झाले होते, तर एका बाजूला कचरा पडला होता, तर काही ठिकाणी कचरा जाळलेल्या अवस्थेत होता. पदपथ तुटलेल्या अवस्थेत असून, या ठिकाणी नगरसेवक निधीतून बसविलेल्या ओपन जीमच्या साहित्यालाही गंज चढला आहे. त्यामुळे दुखापत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या एकूणच दयनीय परिस्थितीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच खडबडून जाग आलेल्या मनपा प्रशासनाने तत्काळ मैदानातील डेब्रिज हटविले असून, कचराही उचलला आहे. मात्र, मैदानाची दैनंदिन साफसफाई व्हावी. मैदानाच्या बाहेर पांचाळ गल्लीच्या कोपऱ्यावर कचरा टाकला जात आहे. त्याबाबतही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता होत आहे.
सुशाेभीकरणासाठी निधी!
शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी नेहरू मैदानाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा खासदार निधी जाहीर केला आहे. जॉगिंग ट्रॅक, ओपन जीम, खो-खोसाठी खांब, बॅडमिंटन खेळासाठी जाळी, तसेच स्वच्छतागृह आणि इतर सुशोभीकरण आणि इतर सुविधांसाठी हा निधी दिला जाणार आहे. त्याचीही तातडीने अंमलबजावणी व्हावी, याकडेही लक्ष वेधले जात आहे.
------------------------------------------------------
फोटो आहे