अखेर गोकूळनगरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:19 AM2017-07-18T02:19:39+5:302017-07-18T02:19:39+5:30
कित्येक वर्षे गोकूळनगर येथील झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा मार्ग अडकून पडला होता. परंतु, निवडणुकीच्या माध्यमातून घेतलेल्या कौलात
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कित्येक वर्षे गोकूळनगर येथील झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा मार्ग अडकून पडला होता. परंतु, निवडणुकीच्या माध्यमातून घेतलेल्या कौलात या परिसराच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गोकूळनगर येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवणाऱ्या पवनसुत को-आॅप. हाउसिंग सोसायटी लि.च्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या नेतृत्वाखालील आई जरीमरीदेवी विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे. निवडणुकीत सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसंग्राम या अभद्र युतीच्या जनसेवा विकास पॅनलला रहिवाशांनी जबरदस्त दणका दिला आहे.
गोकूळनगर येथील पाच एकरवर झोपडपट्टी वसलेली आहे. तिचा पुनर्विकास होण्यासाठी येथील रहिवाशांनी एकत्र येऊन २००६ साली पवनसुत को-आॅप. हाउसिंग सोसायटीची स्थापना केली आहे. या सोसायटीचे नेतृत्व स्थानिक नगरसेविका स्व. शारदा पाटील यांनी केले आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील ते करीत आहेत. पाटील यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून या प्रकल्पाला सीसी मिळवून दिली. ठामपाच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर येथील विरोधी पक्षांनी वातावरण गढूळ करून पवनसुत को-आॅप. हाउसिंग सोसायटीच्या निवडणुकीत राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी विकासाला मत दिल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली. पवनसुत को-आॅप. हाउसिंग सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक शासनाच्या निवडणूक प्राधिकरणाद्वारे रविवारी वर्धमान हॉल, गोकूळनगर येथे झाली. या निवडणुकीत एकूण ६८१ पैकी ५३८ सदस्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. सर्वसाधारण मतदारसंघासाठी १४ सदस्य, महिला राखीव मतदारसंघासाठी २ सदस्य, इतर मागासवर्ग राखीव मतदारसंघ १, विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागासवर्ग राखीव मतदारसंघ, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती राखीव मतदारसंघासाठी १ सदस्याची निवडणूक झाली.
- १९ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत पाटील यांच्या नेतृत्वाखालील आई जरीमरीदेवी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी विजय संपादन केला. उपनिबंधक अजित सासवडे यांच्या आदेशाने एसआरए अधिकारी सुनील शिंदे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.