अखेर खड्डयांच्या ठिकाणी डांबराचे पॅच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:53 AM2021-02-20T05:53:10+5:302021-02-20T05:53:10+5:30
डोंबिवली : ठाकुर्ली परिसरातील ९० फिट रोड आणि रेल्वे समांतर रस्त्यावर गेली दोन वर्षे संथगतीने सुरू असलेल्या कामांबाबत ...
डोंबिवली : ठाकुर्ली परिसरातील ९० फिट रोड आणि रेल्वे समांतर रस्त्यावर गेली दोन वर्षे संथगतीने सुरू असलेल्या कामांबाबत ‘लोकमत’मध्ये ‘दोन वर्षे रस्त्याची कामे सुरू असल्याने गैरसोय’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते. याची दखल घेत संबंधित यंत्रणेने बुधवारी मध्यरात्रीपासून ९० फिट रोडवरील खड्डे डांबराच्या पॅचने भरण्यास सुरुवात केली आहे.
ठाकुर्लीतील ९० फिट रोड आणि कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर अमृत योजनेंतर्गत मलवाहिनी टाकणे असो अथवा महानगर गॅस वाहिनी टाकण्याची कामे दोन वर्षाहून अधिक काळ सुरू आहेत. परंतु ही कामे संथगतीने सुरू असल्याने दोन्ही रस्त्यांवरील एका दिशेकडील रस्ते बंद ठेवले आहेत. याचाच एक भाग असलेल्या कल्याणहून डोंबिवलीकडे येणाऱ्या समांतर रस्त्यावर मलवाहिनी टाकण्याचे काम मार्गी लागूनही डांबरीकरण झालेले नव्हते. तर ९० फिट रोडवरील म्हसोबा चौक ते खंबाळपाडा रोडकडे जाणारा रस्ताही अनेक दिवसांपासून खोदकामांमुळे बंद आहे. खंबाळपाडयातून म्हसोबा चौकाकडे येणारा मार्गही खड्डयात गेल्याने वाहनचालकांची कसरत सुरूच आहे. ही कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असो अथवा महानगर गॅसच्या माध्यमातून सुरू असली, तरी त्यावर केडीएमसीचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नसल्याकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. दरम्यान, वृत्त प्रकाशित होताच मनसेचे शहरअध्यक्ष मनोज घरत यांनी घटनास्थळी धाव घेत संथगती कामाबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन जाब विचारला होता. दरम्यान, खंबाळपाडयातून म्हसोबा चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली असून, डांबराचे पॅच मारले जात आहेत. खड्डे बुजविण्यास सुरुवात झाल्याने वाहनचालकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
------------------------------------------------------
फोटो ओळ : केडीएमसीने ९० फिट रोडवरील डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात केली. (छाया : प्रशांत माने)