अखेर भार्इंदरमधील बंद पोलीस चौक्यांना मिळाले पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 10:28 PM2018-03-30T22:28:20+5:302018-03-30T22:28:20+5:30
महापालिकेमार्फत नगरसेवक निधीतून बांधलेल्या व गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या पोलीस चौक्यांना आता पोलीस मिळू लागले आहेत.
मीरा रोड - महापालिकेमार्फत नगरसेवक निधीतून बांधलेल्या व गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या पोलीस चौक्यांना आता पोलीस मिळू लागले आहेत. चौक्या सुरू झाल्याने गुन्हेगारीला आळा बसेल व सुरक्षिततेची भावना वाढेल, अशी आशा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
भार्इंदर पश्चिमेस रेल्वे स्थानक जवळील बालाजी नगर येथे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांच्या नगरसेवक निधीतून पोलीस चौकी बांधण्यात आली होती. आॅगस्ट २०१४ मध्ये सदर चौकीचे उद्घाटन तत्कालीन महापौर कॅटलीन परेरा, उपअधीक्षक सुहास बावचे आदींच्या हस्ते झाले होते. रेल्वे स्थानकास लागून असलेल्या या परिसरात लूटमार, चोरीपासून अगदी हत्येची देखील घटना घडली होती.
काही महिन्यांआधी तर येथील रेल्वेचे तिकीट घर चोरीसाठी फोडण्यात आले होते. रात्री अपरात्री असामाजिक प्रवृत्तींचा असलेला वावर, चेन स्रेचिंग आदींमुळे नागरिकांनी सातत्याने पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी चालवली होती. नगरसेवक पाटील देखील त्यासाठी पत्रव्यवहार करत होते.
अखेर सदर चौकीसाठी भार्इंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बिश्वास यांची बीट अधिकारी म्हणून सदर चौकीत नियुक्ती केली आहे. त्यामुळे नेहमी बंद राहणारी चौकी आता सुरू झाल्याने येथील गुन्हेगारी प्रवृत्ती व घटनांवर आळा बसेल अशी आशा आहे. पण नियमितपणे त्यातही रात्रीच्या वेळेस पोलिसांची उपस्थिती गरजेची मानली जातेय. बालाजीनगरच्या चौकीप्रमाणेच भार्इंदर पूर्व - पश्चिम जोडणा-या उड्डाणपुलाखाली नगरसेवक सुरेश खंडेलवाल यांच्या नगरसेवक निधीमधून पोलीस चौकी बांधण्यात आली होती. सदर चौकी देखील बांधल्यापासून बंदच होती. पोलीस बळ नसल्याचे कारण नेहमी दिले जात होते.
खंडेलवाल यांनी चौकी सुरू करावी म्हणून पाठपुरावा चालवला होता. नुकतीच निरीक्षक कांबळे यांनी चौकीची पाहणी केली. या वेळी रहिवासीसुद्धा उपस्थित होते. चौकीची रंगरंगोटी, आवश्यक सुविधा वगैरे उपलब्ध करून देण्याचे ठरले. सदर चौकी देखील सुरू केली जाणार असल्याचे आश्वासन कांबळे यांनी दिल्याचे खंडेलवाल म्हणाले.