रस्ते, फुटपाथ अडविणाऱ्यांवर अखेर कारवाईचा बडगा
By Admin | Published: December 27, 2015 12:48 AM2015-12-27T00:48:49+5:302015-12-27T00:48:49+5:30
रस्ते, फुटपाथ आणि सर्व्हिस रस्ते अडवून शोरूम, गॅरेजवाल्यांनी हे रस्ते हडप केल्याने येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
ठाणे : रस्ते, फुटपाथ आणि सर्व्हिस रस्ते अडवून शोरूम, गॅरेजवाल्यांनी हे रस्ते हडप केल्याने येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यानुसार, त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत मागील सहा महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसांनी दिले होते. आता सहा महिन्यांनंतर पालिकेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करीत वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या १० टीमने शहरातील सर्वच ठिकाणी एकाच वेळी कारवाई करून या शोरूमआणि गॅरेज मालकांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
एका दिवसात १०१ वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ५३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांनी यासंदर्भात कारवाईचा बडगा उगारून अशा प्रकारे रस्ते, फुटपाथ अडविणाऱ्यांच्या विरोधात १० हजारांपर्यंतची दंडाची कारवाई करण्याचा प्रस्ताव पुढे आणला होता.
मागील वर्षी या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही कारवाई वाहतूक पोलिसांनी करावी, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ हे पालिकेकडून पुरविले जाईल, असे आश्वासनही पालिकेने दिले होते. परंतु ही कारवाई झालीच नाही. मधल्या काळात तीन आठवड्यांपूर्वीदेखील वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याचे संकेत देऊनही कारवाई सुरू झाली नव्हती.