अखेर सावित्रीबाई फुले नाट्यगृह डिसेंबरपर्यंत सुरूच राहणार, केडीएमसी आयुक्त वेलारसू यांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 05:28 PM2017-09-28T17:28:43+5:302017-09-28T17:29:22+5:30
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कल्याण मधील अत्रे रंगमंदिर, व डोंबिवली मधील सावित्रीबाई फुले कला मंदिर, हे दुरुस्ती करीता बंद ठेवण्यांत आलेले आहे. मात्र रंगकर्मी, नाटयरसिकांची मागणी विचारात घेवून सावित्रीबाई फुले कलामंदिरातील वातानुकुलित यंत्रणेची तातडीने दुरुस्ती किंवा पयार्यी व्यवस्था करुन नाटयगृह खुले करण्याचे आदेश पालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी बुधवारी दिले.मात्र नाटयगृह सुरु असताना वातनुकुलित यंत्रणेंत बिघाड झाल्यास प्रशासन याची जबाबदारी घेणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले असून याची नोंद नाटयरसिकांनी व रंगकर्मी यांनी घ्यावी असेही प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले.
अत्रे रंगमंदिर १ एप्रिलपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यांत आले आहे. गेल्या आठवड्यात सावित्रीबाई फुले रंगमंदिरातील वातानुकुलित यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने त्याची दुरुस्ती करणे करीता काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. नाटयरसिक व रंगकर्मी हे विविध नाटके व कार्यक्रमापासुन वंचित राहू नये म्हणुन सदरचे नाटयगृह हे तीन महिन्याकरीता बंद ठेवण्यांत येणार होते. परंतू नाटयरसिक,रंगकर्मी यांनी केलेली मागणी विचारात घेता डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले कलामंदिरातील वातानुकुलित यंत्रणा दुरुस्ती करुन किंवा पयार्यी व्यवस्था तातडीने करुन सदरचे कलामंदिर डिसेंबर पर्यंत उपलब्ध करून देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला.
आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ज्यांना नाटकाचे व इतर कार्यक्रमाचे बुकिंग करावयाचे असेल त्यांनी करावे.या संपूर्ण वातानुकुलित यंत्रणेकरीता दुरुस्तीसाठी काही आवधी लागणार आहे, त्यामुळे पयार्यी व्यवस्था म्हणून अत्रे रंगमंदिरातील काम तातडीने करण्यांत येवून आणि त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून ते रंगमंदिर जानेवारी २०१८ ला सुरु करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. अत्रे रंगमंदिर सुरु झाल्यानंतर सावित्रीबाई फुले कलामंदिर वातानुकुलित यंत्रणा नव्याने बसविण्याकरीता जानेवरी ते फे्ब्रुवारी २०१८ दोन महिन्याच्या कालावधी करीता बंद ठेवले जाणार आहे असे देखील बैठकित स्पष्ट करण्यात आले.
‘लोकमत’च्या हॅलो ठाणेमध्ये सोमवारी आणि-मंगळवारी ‘सणासुदीला सांस्कृतिक ठणठणाट’ या मथळयाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची कल्याण-डोंबिवलीत महापालिकेसह सांस्कृति संस्था, मंडळ आदी ठिकाणी चर्चा झाली. त्यामुळे शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी यांनी तातडीने फुले नाट्यगृहाला भेट दिली. तसेच त्यानंतर तातडीने आयुक्तांना अहवाल दिला. वेलारसू यांनीही सर्व संबंधित यंत्रणांशी चर्चा करत नाट्यगृह सद्द:स्थितीत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. बहुतांशी सामाजिक संस्थांनी यासंदर्भात आवाज उठवल्याने ‘लोकमत’चे आभार मानले. महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही लोकमत च्या वृत्तामुळे प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला असे सांगत रसिकांसाठी हा निर्णय महत्वाचा असल्याचे स्पष्ट केले.