अखेर उत्तन समुद्रकिनारी साफसफाईसाठी नेमले पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:45 AM2021-09-21T04:45:34+5:302021-09-21T04:45:34+5:30
मीरारोड : शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची असताना पालिका मात्र जबाबदारी झटकत असल्याचे वृत्त लोकमतने २४ जुलै ...
मीरारोड : शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची असताना पालिका मात्र जबाबदारी झटकत असल्याचे वृत्त लोकमतने २४ जुलै रोजी उत्तन समुद्रकिनाऱ्यावरील कचऱ्याबाबत दिले होते. त्याची दखल घेऊन महापालिका आयुक्तांनी येथील दैनंदिन स्वच्छतेसाठी १० कर्मचाऱ्यांचे पथक नेमले आहे.
शहरातील सार्वजनिक समुद्र व खाडीकिनारे, तलाव आदी नियमित स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिकेची आहे. परंतु, महापालिका मात्र आपली जबाबदारी टाळत आली होती. लोकमतने उत्तन समुद्र किनाऱ्यावर सततच्या अस्वच्छतेच्या साम्राज्याबाबत महापालिका जबाबदारी टाळत असल्याचे वृत्त जुलै व ऑगस्टमध्ये दिले होते. २४ जुलैच्या वृत्तानंतर महापालिकेने साफसफाईची जबाबदारी घेतल्याचे सांगितले होते.
आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्तन समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवून साजरा केला होता, तर स्थानिक नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी ६ ऑगस्ट रोजी आयुक्तांना पत्र देऊन अतिरिक्त सफाई व सुरक्षा कर्मचारी पुरवण्याची मागणी केली होती. किनारा सफाई मोहीम राबवणाऱ्या फॉर फ्युचर इंडिया, सोशल शेड या संस्थेच्या तरुणांनीसुद्धा किनारा नियमित स्वच्छतेसाठी अपेक्षा व्यक्त केली होती. अखेर आयुक्त दिलीप ढोले यांनी उत्तन समुद्र किनाऱ्याच्या दैनंदिन स्वच्छतेसाठी नऊ कर्मचारी व देखरेखीसाठी एक निरीक्षक असे दहा जणांचे पथक नेमले आहे.
उत्तन-पाली भागातील समुद्र किनारा पर्यटकांसह शहरातील नागरिकांचे निसर्गाच्या सानिध्यात विरंगुळ्यासाठीचे महत्त्वाचे ठिकाण आहे. उत्तन किनारी लोकांची गर्दी असते. आता महापालिकेने उत्तन समुद्र किनारा स्वच्छतेची जबाबदारी घेतल्याने येथील किनारे नियमित स्वच्छ राहतील. स्थानिक मच्छीमारही स्वच्छतेबाबत अधिक जागरूक राहून परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यात पुढाकार घेणार आहेत.