चोरीच्या नळजोडण्या शोधण्यासाठी अखेर मीरा-भाईंदर महापालिकेने नेमली पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 04:10 PM2021-10-25T16:10:31+5:302021-10-25T16:10:42+5:30
मीरा भाईंदर शहर हे अनधिकृत नळजोडण्या साठी नेहमीच वादग्रस्त ठरले आहे.
मीरा रोड - मीरा भाईंदर मध्ये तांत्रिक कारणांनी पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊन उद्भवलेल्या पाणीटंचाई व त्यावरील राजकीय आंदोलनांच्या अनुषंगाने महापालिकेने आता शहरातील अनधिकृत नळ जोडण्या शोधून काढण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे पथके नेमली आहेत.
मीरा भाईंदर शहर हे अनधिकृत नळजोडण्या साठी नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात चोरीची नळकनेक्शन घेण्यात आल्याचे सातत्याने समोर आले आहे. परंतु चोरीच्या नळ जोडण्या सापडून देखील तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे नाळ जोडण्या घेण्याचे असंख्य प्रकार होऊन देखील सरसकट गुन्हे दाखल करण्यास मात्र कमालीची टाळाटाळ सुरूच आहे . त्यामुळे अनधिकृत नळ जोडण्या आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे घेतल्या जाणाऱ्या नळ जोडण्यां प्रकरणी महापालिका प्रशासन व नगरसेवक, राजकारणी यांची भूमिका संशयास्पद आहे.
चोरीच्या नळ जोडण्या दंड आकारून अधिकृत करण्याचा खास शासन आदेशातील कालमर्यादेचा सुद्धा भ्रश्टहेतूने जाणीवपूर्वक उल्लंघन करून चोरीच्या नळ जोडण्या अधिकृत केल्या गेल्या आहेत . अनधिकृत नळ जोडण्याचा दंड व कारवाई टाळण्यासाठी चक्क नवीन नळ जोडण्या म्हणून नोंदीच्या गंभीर प्रकारांना पाठीशी घातले गेल्याचे आरोप नवीन नाहीत. त्यातच आता पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्याने तांत्रिक कारणांनी उद्भवलेल्या पाणी टंचाईला राजकीय मुद्दा बनवून सर्वच पक्षांनी आपली राजकीय पोळी पोलीस व पालिकेच्या साक्षीने भाजून घेण्याचा प्रयत्न केला . यावेळी चोरीच्या नळ जोडण्यांचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे.
अनुषंगाने आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देश नुसार पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी शुक्रवारी कार्यालयीन आदेश काढून अनधिकृत नळ जोडण्या शोधून काढण्यास कळवले आहे. त्यासाठी पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंते , लिपिक , मेस्त्री , मीटर वाचक यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे . विभाग निहाय पथके नेमली असून त्यांनी निवासी व अनिवासी अनधिकृत नळजोडण्यांचे सर्वेक्षण करून ७ दिवसात अहवाल सादर करायचा आहे. चुकीची वा खोटी माहिती दिल्यास त्या कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक ) नियम १९७९ नुसार कारवाईचा इशारा वाकोडे यांनी दिला आहे .