अखेर ठामपा प्रशासन नरमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:05 AM2019-03-02T00:05:14+5:302019-03-02T00:05:22+5:30
सत्ताधाऱ्यांचा आटापिटा : पालकमंत्र्यांच्या तंबीनंतर रखडलेले प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वादामुळे विकासकामांच्या प्रस्तावांना प्रशासनाने ब्रेक लावून काही कामांमध्ये रिंग झाल्याचा संशय व्यक्त करून ती थांबवली होती. तसेच स्थायी समितीच्या बैठकीला एकही प्रस्ताव न पाठवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पालकमंत्र्यांनी कडक भूमिका घेऊन कानउघाडणी केल्यानंतर प्रशासन चांगलेच नरमले असून वादावर पडदा टाकून शनिवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत अनेक रखडलेले प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवले आहेत. यामध्ये त्या ८०० कोटींच्या रस्त्यांच्याही काही कामांचा समावेश असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
मागील पाच ते सहा दिवस सुरू असलेल्या प्रशासनाच्या या नाट्यावर अखेर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडदा टाकला आहे. त्यांच्या मध्यस्थीनंतर रद्द केलेली विकासकामे मार्गी लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. परंतु, ज्या निविदांमध्ये संगनमत झाले असेल, त्यांची छाननी केली जाणार असून त्यानंतरच ते प्रस्ताव मार्गी लावले जातील, असेही निश्चित केले आहे. या वादात सुवर्णमध्य काढण्यासाठी पालिकेचे दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी रात्री पालकमंत्र्यांकडे गेले होते. यावेळेस त्यांनी या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर, प्रशासनाने एक पाऊल मागे घेऊन हा निर्णय घेतल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, स्थायी समितीकडे कोणत्याही स्वरूपाचे प्रस्ताव न पाठवण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेलाही बसण्याची चिन्हे निर्माण झाली होती. अनेक कामांच्या निविदा अंतिम होऊन त्या स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी पाठवण्याचे शिल्लक होते. परंतु, आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उद्घाटने, लोकार्पण आणि भूमिपूजन अशी सर्वच कामे आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे होती. परंतु, आयुक्तांनी आपले निर्णय मागे घेतल्याने आता शनिवारच्या स्थायी समितीच्या या बैठकीत मुंब्रा प्रभाग समितीमधील विविध रस्त्यांवरील चरांचे पुनर्पृष्ठीकरण करणे, दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह, भारतरत्न डॉ. सचिन तेंडुलकर मिनी क्रीडासंकुल व शरदचंद्र पवार मिनी क्रीडासंकुलाची दैनंदिन साफसफाई खाजगीकरणातून करणे, अमृतनगर येथे सुन्नी कबरस्तान शेड बसवणे, कोपरी-नौपाडा, माजिवडा-मानपाडा या प्रभाग समितीअंतर्गत अस्तित्वातील उद्याने व रस्ता दुभाजकांची निगा, देखभाल, दिवा येथील रेल्वेलाइनवर लेव्हल क्रॉसिंग नं. २९ सी येथील रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) संकल्पचित्रासह जोडरस्त्याचे बांधकाम करणे आदींसह इतर महत्त्वाचे प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहेत.
याशिवाय, स्थायी समितीमध्ये आणखी कोणते प्रस्ताव पाठवायचे, यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिरवार यांच्या दालनात सकाळी बैठक झाली. त्यानंतर, सर्व विभागांचे अहवाल घेऊन दुपारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही बैठक घेतली. तीत कार्यादेश देण्याचे शिल्लक असलेल्या प्रस्तावांची एक वेगळी वर्गवारी, निविदा अंतिम होत असलेल्या प्रस्तावांची दुसरी वर्गवारी आणि ज्या कामांचे प्रस्ताव तयार करायचे आहेत, या पद्धतीने तीन स्वरूपांत प्रस्तावांची वर्गवारी केली. त्यानुसार, यामध्ये ज्या कामांमध्ये रिंग झाल्याचा संशय आहे, असे प्रस्ताव बाजूला सारले असून त्यांची चौकशी झाल्यानंतरच त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. परंतु, असे प्रस्ताव कमी असल्याचेही बोलले जात आहे. त्यानुसार, यातून जे प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवायचे आहेत, त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
दिवा आरओबीचा प्रस्तावही मार्गी
शनिवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत दिवा येथील रेल्वेलाइनवर लेव्हल क्रॉसिंग नं. २९-सी येथील रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) च्या संकल्पचित्रासह जोडरस्त्याचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आला असून यासाठी ३८ कोटी ९० लाखांचा खर्च केला जाणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मात्र, आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हा प्रस्ताव रखडला होता. परंतु, आता शनिवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत तो पटलावर आला असून त्याचे भूमिपूजन लागलीच ३ मार्च रोजी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी हा महत्त्वाचा प्रस्ताव मानला जात आहे. स्थायी समितीची मंजुरी मिळणे अपेक्षित धरून त्याचे भूमिपूजन १ मार्च रोजी असे निश्चित केले होते.
बहुसंख्य रस्त्यांचे प्रश्न
प्रत्येक वेळेस सकाळी लागणारी स्थायीची बैठक ही दुपारी ठेवली आहे. यामध्ये ८०० कोटींच्या रस्त्यांचे बहुसंख्य प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहेत. त्यामुळे रखडलेली विकासकामे आता आचारसंहिता लागण्यापूर्वी मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यातूनही जे प्रस्ताव शिल्लक राहतील, त्यासाठी पुन्हा ५ मार्च रोजी दुसरी स्थायी समितीची बैठक लावण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. आयत्यावेळचे विषय म्हणून येतील.