अखेर खड्डे बुजविण्याच्या मोहीमेला सुरवात
By अजित मांडके | Published: July 16, 2024 03:14 PM2024-07-16T15:14:35+5:302024-07-16T15:14:49+5:30
सार्वजनिक बांधकाम आणि मेट्रोच्या मदतीला धावली ठाणे महापालिका
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील कापुरबावडी, माजिवडा, नितीन कंपनी, तिनहात नाका, घोडबंदर भागात रस्त्यांवर पडलेल्या खड्यांचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर अखेर सर्व प्राधिकरण खडबडून जागे झाले आहे. त्यानुसार सोमवार पासून खड्डे बुजविण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतली आहे. तिकडे घोडबंदर भागातील खड्डे बुजविण्यासही सुरवात झाली. ठाणे महापालिका देखील या प्राधिकरणांच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पुढे आली आहे. त्यामुळे आता कापुरबावडी, माजिवडा उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्यात आल्याचे दिसत आहे.
मुंबई-नाशिक महामार्ग असेल किंवा घोडबंदर रोड असेल या सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे असे चित्र निर्माण झाले आहे. घोडबंदर भागात मेट्रोचे काम सुरु आहे. तसेच नव्याने येथील रस्त्यांच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु यामुळे वाहतुक कोंडी आणि ठिकठिकाणी रस्त्यांना खड्डे पडल्याचे चित्र आहे. तर कापुरबावडी, माजिवडा या उड्डाणपुलांवर देखील खड्डेच खड्डे असे चित्र निर्माण झाले होते. या पुलावरील खड्डात दुचाकीस्वार पडू शकतात एवढ्या मोठ्या आकाराचे खड्डे होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे बुजविले होते. परंतु पाऊस झाला आणि पुन्हा खड्डे उखडल्याचे दिसून आले. खड्ड्यांमुळे वाहतूकीचा वेग मंदावून कोंडी होत होती. तसेच या खड्ड्यांमुळे अपघातांची भिती व्यक्त होत होती. या संदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर संबधींत प्राधिकरणाने पावसाने उसंत घेतल्यावर खड्डे बुजविले जातील असे आश्वासन दिले होते. तर मनसे देखील सोमवारी सांयकाळी घोडबंदर भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांच्या विरोधात आंदोलन केले होते.
अखेर सोमवारी सांयकाळ पासून कापुरबावडी, माजिवडा आदींसह इतर ठिकाणी रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. खड्डे बुजविण्याच्या या मोहीमेत ठाणे महापालिका देखील सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.
तिकडे घोडबंदर भागातील खड्डे बुजविण्यासाठी मेट्रोने या पट्यात आता मास्टीकचा प्लान्ट उभारला असून त्याच्या माध्यमातून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याची मोहीम सुरु केली आहे. याठिकाणी देखील महापालिका त्यांच्या मदतीली धावल्याचे दिसत आहे. त्यानुसार पुढील दोन ते तीन दिवसात घोडबंदर भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविले जातील असा दावा प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे.
महापालिकेला खर्च मिळणार आहे.
ठाणे महापालिका दरवर्षी इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवित आहे. मागील तीन ते चार वर्षापासून ही मोहीम सुरु आहे. परंतु यासाठी झालेला खर्च सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा एमएमआरडीए असेल त्यांच्याकडून अद्यापही खड्डे बुजविण्याचा खर्च मिळू शकलेला नाही. त्यामुळे यंदा महापालिकेने पुढाकार घेतला असला तरी देखील तो खर्च मिळणार का? या बाबत शंका निर्माण केली जात आहे.