अखेर दोन दिवसात होणार नालेसफाईला सुरुवात, पालिकेने हटविली निविदेतील 'ती' अट!
By अजित मांडके | Published: April 24, 2024 03:18 PM2024-04-24T15:18:55+5:302024-04-24T15:19:14+5:30
दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरीत आठ प्रभाग समितींमधून ठेकेदार पुढे आल्याने आता शनिवार पासून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
ठाणे : पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे वेळेत व्हावी यासाठी महापालिकेने यंदा आधीच पावले उचलली होती. त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली. मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे निविदेतील अटी शर्ती शिथील केल्या. अखेर आता दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरीत आठ प्रभाग समितींमधून ठेकेदार पुढे आल्याने आता शनिवार पासून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
ठाणे महापलिका हद्दीतील कळवा प्रभाग समिती सर्वाधिक २०१ नाले असून त्याखालोखाल दिव्यात १३१, नौपाडा प्रभाग समितीत ४९, वागळे इस्टेटमध्ये ३८, लोकमान्य-सावरकरात ३४, उथळसमध्ये ३४, वर्तकनगरात २९, माजीवाडा- मानपाडा ४४, मुंब्रयात ८० नाले असल्याची नोंद आहे. यंदाही नालेसफाईच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून १५ एप्रिलपासून कामे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. यामुळे पालिकेने मार्च महिन्यातच नालेसफाईच्या कामांच्या नऊ प्रभाग समितीनिहाय निविदा काढल्या होत्या.
महापालिकेने टाकलेल्या काही अटी आणि शर्तींमुळे ठेकेदारांनी नालेसफाईच्या कामांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. तसेच यंदा खर्चात देखील तीन कोटींची कपात केली होती. त्यामुळे देखील ठेकेदारांनी नकार घंटा वाजविली होती. त्यामुळे पालिकेने वारंवार निविदेला मुदतवाढ दिली. त्यानंतर वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर याठिकाणीच ठेकेदारांनी निविदा भरल्याचे दिसून आले. त्यानंतर महापालिकेने पुन्हा निविदेला मुदतवाढ देत २२ एप्रिल पर्यंत वाढविली होती.
ही मुदतवाढ देत असतांना निविदेत असलेली आपत्कालीन परिस्थितीत वर्षभर नालेसफाई करण्याची अट शिथील करण्यात आली. ही अट शिथिल करण्यात आल्याने अखेर दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरीत आठ प्रभाग समितींना ठेकेदार मिळाले आहेत. त्यानुसार आता शनिवार पासून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. त्यानुसार माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.