अखेर मीरारोडच्या मेट्रो खालील दुसऱ्या उड्डाणपूलाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
By धीरज परब | Updated: March 8, 2025 21:20 IST2025-03-08T21:20:08+5:302025-03-08T21:20:23+5:30
Mira Road News: गेल्या महिन्या भरा पासून उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मीरारोडच्या मेट्रो मार्गिके खालील साईबाबा नगर ते शिवार उद्यान दरम्यानच्या उड्डाणपूलाचे उदघाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ८ मार्च रोजी करण्यात येऊन पूल वाहतुकीसाठी खुला केला गेला.

अखेर मीरारोडच्या मेट्रो खालील दुसऱ्या उड्डाणपूलाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
मीरारोड- गेल्या महिन्या भरा पासून उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मीरारोडच्या मेट्रो मार्गिके खालील साईबाबा नगर ते शिवार उद्यान दरम्यानच्या उड्डाणपूलाचे उदघाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ८ मार्च रोजी करण्यात येऊन पूल वाहतुकीसाठी खुला केला गेला. यामुळे नागरिकांची रोजच्या मोठ्या वाहतूक कोंडीच्या जाचातून सुटका झाली आहे. मीरा भाईंदर मेट्रो हि शहराचा मुख्यामार्ग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरून जात असल्याने रस्त्याची ररुंदी कमी झाली आहे. शिवाय लगतचा सर्व्हिस रोड सुद्धा अजून महापालिकेने विकसित केलेला नाही. त्यामुळे ह्या मार्गावर त्यातही विशेषतः प्रमुख नाक्यांवर मोठी वाहतूक कोंडी होते.
ह्या कोंडीतून सुटका व्हवी म्हणून आमदार असताना प्रताप सरनाईक यांनी मेट्रो मार्गिके खालून ३ उड्डाणपूलची मागणी करत पाठपुरावा केल्याने ते मंजूर केले गेले. त्यातील प्लेझन्टपार्क ते साईबाबा नगर हा उड्डाणपूल गेल्यावर्षी खुला झाला. तर साईबाबा नगर ते शिवार उद्यान हा पुलाचे काम फेब्रुवारीत पूर्ण झाले मात्र उदघाटन होत नव्हते. जेणे करून एस के स्टोन येथे कोंडी होऊन सुरु असलेल्या उड्डाणपुलावर सुद्धा वाहनांच्या रांगा लागायच्या.
अखेर ८ मार्च रोजी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुलाचे उदघाटन करून तो वाहतुकीसाठी खुला केला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मीरा भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता अभिजीत भिशीकर आदी उपस्थित होते.
आज उदघाटन झालेल्या उड्डाण पुलाला स्वर्गीय रतनजी टाटा उन्नत मार्ग असे नाव देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले. तर प्लेझेंट पार्क ते साईबाबा नगर उड्डाणपुलाला धर्मवीर आनंद दिघे उन्नत मार्ग आणि शिवार उद्यान सिग्नल ते गोल्डन नेस्ट सर्कल पर्यंतच्या उड्डाण पुलास स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उन्नत मार्ग अशी नावे देण्याचे निवेदन मंत्री सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिले आहे.
साईबाबा नगर - शिवार उद्यान पूल खुला झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. तर शिवार उद्यान ते गोल्डन नेस्ट उड्डाणपूल देखील लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाईल असे मंत्री सरनाईक म्हणाले.