अखेर घोडबंदर रोडवरील गायमुख घाट रस्त्याचं काम वेळेत पूर्ण; दोन्ही बाजूंनी वाहतुक सुरू
By सुरेश लोखंडे | Published: June 8, 2024 09:26 PM2024-06-08T21:26:59+5:302024-06-08T21:27:07+5:30
सध्या दोन्हीं बाजूने वाहनांची वाहतूक सुरळीत सुरु झाल्याची माहिती ठाणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी दिली.
ठाणे : घोडबंदर रोडवरील गायमुख घाट रस्त्याचे काम वेळेत पूर्ण झाल्याने या घाट रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी शनिवारी सकाळपासूनच वाहतुक सुरळीत सुरू झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी यंदाच्या पावसाळ्यात सुरळीत धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याचदरम्यान वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या दोन हजार 226 अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय काळात सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल ठाणे शहर पोलिसांतर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोडच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 24 मे 2024 पासून हाती घेतले होते. याचदरम्यान अवजड वाहनांकरिता पर्यायी मार्ग उपलब्ध करून देत, त्या रोडच्या दुरुस्ती सुरू करून प्रथम मीरा-भाईंदर कडील काम 29 मे 2024 रोजी पर्यंत तर 30 मे पासून 07 जून 2024 रोजी पर्यंत गायमुख घाटातील एकेरी वाहतूक रस्ता बंद करून दुसऱ्या सिंगल रस्त्यावर वळवून मिरा भाईंदर परिसरतील वाहतूक इंडियन ऑईल पेट्रोल पंपसमोर वाहतुकीसाठी व ठाणेकडील वाहतूक जे कुमार इंफ्रा येथे 25-25 मिनिटे थांबवून वाहतूक सुरू ठेवली होती. तर शनिवारी सकाळी हा घाट रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून सध्या दोन्हीं बाजूने वाहनांची वाहतूक सुरळीत सुरु झाल्याची माहिती ठाणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी दिली.