अखेर तिसऱ्या प्रयत्नात रोहन आयएएस झाला
By admin | Published: June 2, 2017 05:35 AM2017-06-02T05:35:58+5:302017-06-02T05:35:58+5:30
भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याची जिद्द बाळगलेल्या रोहन आगवणे याने आयएएस होण्याचे स्वप्न बाळगले. तो यापूर्वी दोन वेळा
जितेंद्र कालेकर/लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याची जिद्द बाळगलेल्या रोहन आगवणे याने आयएएस होण्याचे स्वप्न बाळगले. तो यापूर्वी दोन वेळा उत्तीर्णही झाला. गेल्या वर्षी ७३५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन आयपीएससाठी निवड झाली. याच प्रशिक्षणादरम्यान जिद्दीने पुन्हा त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि तिसऱ्या प्रयत्नात देशात ५८२ क्रमांक मिळवून अखेर त्याची भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) निवड झाली.
इतरांपेक्षा रोहनच्या जिद्दीचा प्रवास काहीसा वेगळा आहे. वडील राज्य शासनाच्या सेवेत सार्वजनिक बांधकाम विभागात अधीक्षक अभियंता. त्यामुळे घरात तशा सर्व सुखसुविधा. रोहनने ठाण्याच्या श्री माँ विद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर आयआयटी मुंबईतून बीटेक पदवी घेतली. पुढे आयआयएम अहमदाबादमधून एमबीए पूर्ण केले. एमबीए पूर्ण करतानाच त्याने आयएएस होण्याचे स्वप्न बाळगले. कोणताही क्लास न लावता स्वयंअध्ययनावर भर दिला. २०१५ मध्ये पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याला आर्म फोर्स हेडक्वार्टरमध्ये निवड झाली. पण, ध्येय पूर्ण न झाल्याने पुन्हा २०१६ मध्ये त्याने नव्याने अभ्यास करून ही परीक्षा दिली. त्या वेळी तो देशात ७३५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन भारतीय पोलीस सेवेसाठी (आयपीएस) त्याची निवड झाली. या वेळी ध्येय गाठता आले नसले, तरी आयपीएसचे प्रशिक्षण घेत असतानाच त्याने पुन्हा २०१७ च्या यूपीएससीची तयारी केली. यात मात्र त्याला यश आले आणि ५८२ क्रमांकाने उत्तीर्ण होऊन आयएएससाठी त्याची निवड झाली.
आईवडिलांकडून मिळालेली शिस्त आणि चांगल्या संस्कारांचे धडे, स्वत:ची मेहनत, जिद्द यामुळेच या यशाचा पल्ला गाठू शकल्याचे रोहनने ‘लोकमत’ला सांगितले.
तरुणांनी पूर्णपणे ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने मेहनत घेऊन वाटचाल केली, तर त्यांची ध्येये निश्चितपणे पूर्ण होऊ शकतात. रोहन सुरुवातीपासूनच कुशाग्र बुद्धीचा अभ्यासू आहे. प्रशासकीय सेवेतून समाजसेवा करण्याची त्याची इच्छा आता पूर्ण झाली. त्याच्या या यशामुळे आम्हा कुटुंबीयांना आनंद आणि समाधान वाटले. -रमेश आगवणे,
अधीक्षक अभियंता, मुंबई