अखेर फेरीवाल्यांविरुद्धच्या कारवाईत अडथळा आणणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 01:05 AM2020-11-11T01:05:32+5:302020-11-11T01:08:41+5:30
पदपथ अडवून नौपाडा परिसरात विक्री करणा-या फेरीवाल्यांविरुद्ध ठाणे महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीने कारवाई केल्यानंतर या कारवाईत अडथळा आणून जप्त केलेले सामान पुन्हा घेण्यासाठी हुज्जत घालीत सहाय्यक आयुक्तांसह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणा-या दोघांना वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: रस्त्यावर अतिक्रमण करीत अडथळा निर्माण केल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकाबरोबर वादावादी करीत त्यांना दमदाटी केल्याप्र्रकरणी विनायक राऊत (४५) आणि बाबासाहेब खेडकर (३५) या दोघांना सोमवारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. सरकारी कामात अडथळा आणणे, दमदाटी करणे आदी कलमांनुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नौपाडा येथील काही फेरीवाल्यांविरुद्ध ८ नोव्हेंबर रोजी ठामपाच्या नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांच्या पथकाने कारवाई केली होती. त्यानंतर फेरीवाल्यांचे सामान जप्त करुन ते लोकमान्यनगर प्रभाग समितीच्या कार्यालयातील गोदामात ठेवले जात असतांनाच महापालिका कर्मचाºयांना विनायक राऊत याच्यासह दोघांनी पाठलाग करुन अडविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथे आलेल्या घोंगे यांच्याशी त्यांनी वादावादी केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी या दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.