अखेर उल्हासनगर महापालिकेला आली जाग; रात्री उशिरा फटाके फोडणाऱ्या ४९ जणांवर गुन्हे
By सदानंद नाईक | Published: November 15, 2023 06:38 PM2023-11-15T18:38:10+5:302023-11-15T18:38:31+5:30
दिवाळी सणादरम्यान हवेची गुणवत्ता रेड झोन मध्ये गेल्यानंतर, महापालिका व पोलीस प्रशासनाला जाग आली.
उल्हासनगर : दिवाळी सणादरम्यान हवेची गुणवत्ता रेड झोन मध्ये गेल्यानंतर, महापालिका व पोलीस प्रशासनाला जाग आली. मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत फटाके फोडणार्या ४९ जणांवर महापालिका व पोलीस प्रशासनाने एकत्र येत कारवाई केली. उल्हासनगरात मध्यरात्री पर्यंत फटाक्यांची आतिषबाजी होऊन हवेची पातळी अत्यंत धोकादायक झाली. यामुळे सर्वस्तरातून महापालिका व पोलीस प्रशासनावर टीका झाली. आयुक्त अजीज शेख यांनी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त सुभाष जाधव, अग्निशमन विभाग प्रमुख बाळू नेटके, प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, जेठानंद करमचंदानी, अनिल खतुरानी, दत्तात्रय जाधव व पर्यावरण विभाग प्रमुख विशाखा सावंत आदी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पोलिसांच्या मदतीने कारवाईचे आदेश दिले. मंगळवारी रात्री १० वाजेनंत्तर फटाके फोडणाऱ्या नागरिकांविरुद्ध महापालिका व पोलीस विभागामार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली. तब्बल ४९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले आहे.
शहरातील सर्व नागरिकांनी पर्यावरण संरक्षणासाठी नियमाचे पालन करावे व पर्यावरणपूरक दिपावली साजरी करावी, असे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी केले. याचबरोबर बांधकामातून व डेब्रिस वाहतुकीतून होणारी धूळ कमी करण्यासाठी शहरात सुरु असलेल्या एकुण १९० बांधकामांना नगररचना कार्यालयांमार्फत नोटीस बजावण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या बांधकामांना स्थगिती देण्यात येणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले. मुख्य अग्निशमन अधिकारी व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी फटाक्याच्या दुकानाची पाहणी केली. प्रत्यक्षात फटाक्याच्या दुकानात फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात साठा केला असून मध्यरात्री पर्यंत फटाक्यांची दुकाने सुरू असल्याचे चित्र शहरात आहे.
फटाक्यांचा टेम्पो व दुकानावर गुन्हा नाही
शहरातील कॅम्प नं-३, कामगार रुग्णालय समोरील रहिवासी क्षेत्रातील नागरिकांनी दिवाळीच्या मध्यरात्री ३ वाजता एक फटाक्यांचा टेम्पो अग्निशमन विभागाला पकडून दिला. अग्निशमन विभागाने फटाक्यांचे गोदाम सील करून टेम्पो जप्त केला. मात्र ४ दिवसानंतरही फटाक्यांचा टेम्पो व गोदाम मालकावर गुन्हा दाखल झाला नाही. अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी गुरवारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली.