उल्हासनगरातील डंपिंग हटाव प्रकरणी अखेर आमदार कुमार आयलानी यांना जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 05:04 PM2020-08-27T17:04:10+5:302020-08-27T17:04:31+5:30
उल्हासनगर पूर्वेतील खडी मशीन येथिल डंपिंग ग्राउंड हटवण्यासाठी भाजप नगरसेवकांनी महापालिकेला ३ सप्टेंबर पासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला.
उल्हासनगर : शहरातील डंपिंग हटवण्यासाठी भाजप नगरसेवकांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आमदार कुमार आयलानी यांनी अखेर उशिराने का होईना. उपोषणाला पाठिंबा दिला. ३ सप्टेंबर रोजी उपोषण होणार असा निर्धार भाजप नगरसेवकांनी केला आहे.
उल्हासनगर पूर्वेतील खडी मशीन येथिल डंपिंग ग्राउंड हटवण्यासाठी भाजप नगरसेवकांनी महापालिकेला ३ सप्टेंबर पासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, साई पक्षाचे नगरसेवक गजानन शेळके, भाजपचे शेरी लुंड, कांचन लुंड, मनोज लासी, प्रदीप रामचंद दानी आदी नगरसेवकांनी उपोषणाला पाठिंबा असल्याचे लेखी पत्र महापालिका आयुक्तांना दिले.
दरम्यान शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांनी डंपिंग ग्राउंड हटवून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उसाटणे गावा जवळील एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकर जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी राज्य शासनाकडे करून राज्याचे मुख्य सचिव यांची भेट घेऊन तसे पत्र दिले.
शहरात डंपिंग ग्राउंड हटवण्याच्या प्रश्नावरून वातावरण तपाल्यानंतर, अखेर शहराचे आमदार कुमार आयालानी यांनी बुधवारी डंपिंग ग्राउंड हटवण्याची मागणी करून उपोषणाला पाठिंबा असल्याचे लेखी पत्र महापालिका आयुक्तांना दिले. महापालिकेकडे डंपिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा नसताना, डंपिंग ग्राउंड हटविण्याची मागणी सत्ताधारी व विरोधी पक्ष करीत असल्याने महापालिकेची पुरती कोंडी झाली. तसेच शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरातील राणा खदान डंपिंग ग्राउंड ओव्हरफ्लो होऊन शेजारील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यावर डंपिंग तात्पुरती कॅम्प नं -५ येथील खडी मशीन येथे हलविण्यात आली. तीन वर्षात खदानची क्षमता संपली असून डंपिंग ग्राउंड वरील दुर्गंधी व आगीच्या धुरामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.