अपघातग्रस्त व्यक्तीला ठेकेदाराकडून आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:26 AM2021-06-27T04:26:12+5:302021-06-27T04:26:12+5:30
अंबरनाथ : कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर चुकीच्या पद्धतीने रस्त्याच्या मध्यभागी काँक्रीटची भिंत उभारण्यात आल्याने त्या भिंतीवर आदळून एका दुचाकीस्वाराचा गंभीर ...
अंबरनाथ : कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर चुकीच्या पद्धतीने रस्त्याच्या मध्यभागी काँक्रीटची भिंत उभारण्यात आल्याने त्या भिंतीवर आदळून एका दुचाकीस्वाराचा गंभीर अपघात झाला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला आर्थिक मदत करण्याची मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली होती. अखेर संबंधित रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने या अपघातग्रस्त व्यक्तीला आर्थिक मदत केली आहे.
काही दिवसांपूर्वी अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका येथे रस्त्यामध्ये बांधलेल्या भिंतीला आपटून त्रिंबक काळे नावाच्या दुचाकीस्वाराचा अपघात झाला. तर याच अपघातात त्याचा जबडा फाटला असून उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारासाठी त्यांना ३ ते ४ लाखांचा खर्च करावा लागणार होता. मात्र, काळे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना हा खर्च करता येणार नव्हता. ही बाब लक्षात घेता अंबरनाथ भाजपचे शहराध्यक्ष अभिजीत करांजुले यांनी एमएमआरडीएकडे या सर्व घटनेबाबत सातत्याने पाठपुरावा केला. तसेच या अपघातग्रस्त व्यक्तीला आर्थिक मदत करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने या अपघातग्रस्त व्यक्तीच्या रुग्णालयाच्या खर्चाची जबाबदारी घेतली असून रुग्णालयाच्या खर्चापोटी दीड लाख रुपये दिले आहेत. चुकीच्या पद्धतीने भिंत बांधल्याने हा अपघात घडल्याचे एमआयडीसीचे अधिकारीही कबूल करीत असले तरी या रस्त्यावरील भिंत ही भविष्यात अनेकांच्या जीवावर बेतणार असल्याने ती भिंत काढण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.