गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 02:59 AM2018-07-15T02:59:30+5:302018-07-15T02:59:32+5:30

विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतानाच घरची परिस्थिती प्रतिकूल असणाऱ्या मात्र शिक्षणाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या आर्थिक भार उचलून संकेत विद्यालय एक वेगळाच आदर्श निर्माण करत आहे.

Financial Assistance to the needy students | गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार

गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार

googlenewsNext

- स्नेहा पावसकर 
ठाणे : विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतानाच घरची परिस्थिती प्रतिकूल असणाऱ्या मात्र शिक्षणाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या आर्थिक भार उचलून संकेत विद्यालय एक वेगळाच आदर्श निर्माण करत आहे. एकीकडे शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना दुसरीकडे संकेत विद्यालय मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते आहे.
मानपाडा येथील संकेत विद्यालय या शाळेची स्थापना १९९२ साली झाली. शाळेत लहान शिशूपासून ते दहावी इयत्तेपर्यंतचे वर्ग चालतात. प्रत्येक इयत्तेच्या दोन तुकड्या असून आजघडीला शाळेत २००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिली इयत्तेपासून विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी शिकवले जाते. दोन्ही तुकड्यांमध्ये सेमी इंग्रजीचे शिक्षण दिले जाते.
मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने इयत्ता दुसरीपासून ‘वाचनकोपरा’ हा उपक्रम राबवला जातो. यात मुलांना ग्रंथालयात जाऊन त्यांच्या आवडीची पुस्तके वाचता येतात. स्कॉलरशिप, प्रज्ञाशोधसारख्या परीक्षांना बसण्याची संधी देऊन विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी करून घेतली जाते. अभ्यासात कमजोर असणाºया मुलांसाठी शाळेतच मोफत शिकवणी घेतली जाते. त्या मुलांचा घरी अभ्यास कसा घ्यावा, याचे त्यांच्या पालकांनाही मार्गदर्शन केले जाते. इतकेच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन आर्थिक मदत करते. त्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी शाळा उचलते.
>आपल्याला मराठी भाषेचा व आपल्या शाळेचा अभिमान असला पाहिजे. केवळ शेजाºयांची मुले इंग्रजी शाळेत जातात म्हणून आपण आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत घालू नये. सुरुवातीला काही पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात आणि नंतर मात्र तेथील खर्च न झेपल्याने पुन्हा मराठी शाळांकडे वळतात. अशा पालकांचा राग येतो, तर मुलांची अवस्था पाहून वाईट वाटते. आमच्या शाळेत मराठी माध्यमातून शिकलेले अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ झाले आहेत. प्रवेशासाठी शाळेत नेहमीच स्पर्धा असते.
-आर.के.चौधरी, मुख्याध्यापक,
प्राथमिक विभाग, संकेत विद्यालय
माझ्या तिन्ही मुली संकेत विद्यालयात शिक्षण घेत आहेत. हुशार विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळवण्याच्या दृष्टीने तर कमजोर मुलांना हुशार बनवण्याच्या दृष्टीने शाळा विविध उपक्रम राबवते. शाळेची शिस्त उत्तम आहे. शाळा व्यवस्थापनाबरोबरच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांना कायम मार्गदर्शन करतात. इंग्रजी माध्यमापेक्षा आमची मुले मराठी माध्यमात शिकतात, याचा आम्हाला आनंद आहे. -शुभांगी कदम, पालक

Web Title: Financial Assistance to the needy students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.