दरवाढीमुळे कोलमडले गृहिणींचे आर्थिक बजेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 01:32 AM2020-10-10T01:32:28+5:302020-10-10T01:32:38+5:30
भाजीपाल्याची आवक घटली; डाळीही १५ ते २० रुपयांनी महागल्या
- हितेन नाईक
पालघर : जिल्ह्यात नाशिक आणि गुजरात राज्यातून भाजीपाला पुरवठा होत असतो, परंतु अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने भाजीपाल्याच्या दरांनी उचल खाल्ली आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तसेच डाळींच्या दरांमध्येही १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.
पालघर जिल्ह्यात नाशिकसह गुजरात राज्यातल्या वापी आणि सुरत भागातून सुमारे ५० ते ६० ट्रक भाजीपाला वितरित केला जातो. तर जिल्ह्यातील सुमारे ६०० हेक्टर क्षेत्रफळावर वेलवर्गीय भाजीपाला ज्यात दुधी, गलके, कारले आदी भाजीसह मिरची, सिमला मिरची, वांगी, टॉमेटो आदीचे उत्पादन घेतले जाते. मात्र अवकाळीमुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. कांद्याचाही ४० ते ५० रुपये प्रतिकिलो असा भाव झाला असून सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार बंद झाले असून नोकऱ्यांवर पाणी फिरले आहे. अनेक उद्योगधंदेही बंद पडल्याने हातमजुरी करणाºया गोरगरीबांसह किरकोळ व्यावसायिकांवरही मोठे संकट कोसळले आहे. अशातच भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने जनसामान्यांना दुहेरी फटका सोसावा लागत आहे.
सध्या लोकल सेवा बंद असल्याने माझ्या पतीला कामावर जात येत नसल्यामुळे एप्रिलपासून अर्धाच पगार मिळत आहे. त्यामुळे आमच्या घरचे बजेट गडबडले असून येत्या सणासुदीच्या दिवसात आणखी भाव वाढण्याची शक्यता वाटते.
- शालिनी मेहेर, ग्राहक
पालघर जिल्ह्यात भाजीपाल्याची नाशिक आणि गुजरातमधून होणारी आवक सध्या घटली असल्याने दर वाढले आहेत. मात्र नोकºया तसेच कामधंदे बंद झाल्याने ग्राहकांकडून कमी भाजीपाला खरेदी केला जात आहे.
-देव लुक्षा, भाजीविक्रेता पालघर
अनेक कष्ट घेऊन शेतकरी शेतमाल पिकवतो, मात्र विक्री व्यवस्थेतील असंख्य अडचणींमुळे तो त्याची विक्री करू शकत नाही. त्यामुळे भाववाढीनंतरही उत्पादकांना कोणताच आर्थिक फायदा होत नाही.
- शेतीनिष्ठ देवेंद्र राऊत, भाजीपाला उत्पादक शेतकरी
भाजीपाला-डाळी महागण्याची कारणे
पालघरला भाजीपुरवठा करणाºया नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने भाजीपाल्याच्या दरांनी उचल खाल्ली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसात डाळीही १५ ते २० रुपयांनी महागल्या आहेत.