दहीहंड्यांचे आर्थिक थर कोसळणार
By admin | Published: July 29, 2015 12:05 AM2015-07-29T00:05:18+5:302015-07-29T00:05:18+5:30
ठाणे शहराची नवीन ओळख दहीहांडीचे ठाणे अशी निर्माण झाली आहे. मात्र, हंडींच्या उंचीवर आलेली मर्यादा आणि रस्त्यावरच्या उत्सवांवरील बंदी त्याचबरोबर आवाजाची मर्यादा
ठाणे : ठाणे शहराची नवीन ओळख दहीहांडीचे ठाणे अशी निर्माण झाली आहे. मात्र, हंडींच्या उंचीवर आलेली मर्यादा आणि रस्त्यावरच्या उत्सवांवरील बंदी त्याचबरोबर आवाजाची मर्यादा यामुळे दहीहांडीचा उत्सव साजरा कसा होणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाने या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे ठाण्यासह इतर भागातील ४ हजारांहून अधिक दहीहंडी आयोजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे. रस्त्यावर होणाऱ्या या आयोजनांमधून अनेक गोविंदा मंडळांचे आर्थिक गणित जोडले गेल्याने या दहीहंड्या रद्द झाल्यास गोविंदांचे आर्थिक थर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाण्यातील ओपन हाऊस, टेंभी नाका, जांभळी नाका, कळवा नाका, शास्त्रीनगर नाका यांचे आयोजन रस्त्यावरच होते. या हंड्याच्या आयोजनामध्ये राजकीय आयोजकांचे प्रमाण ९० टक्के इतके आहे. हे उत्सव आयोजित करणारे मोठ्या प्रमाणात वर्गण्या गोळा करीत असतात. या उत्सवांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्थकारण निर्माण होत असते. रस्त्यावर होणाऱ्या लहानमोठ्या दहीहंडी आयोजनांचा थेट संबंध गोविंदा मंडळांच्या आर्थिक उलाढालीशीही आहे. हंडींच्या बक्षीसांवर अनेक गोविंदा मंडळांचे शैक्षणिक, आरोग्यविषयक विविध वार्षिक उपक्र म ठरतात. त्यामुळे त्याचा थेट परिणाम या उपक्रमांवरही होण्याचीही शक्यता आहे. शिवाय, अनेक ठिकाणी गणेशोत्सवाचे आर्थिक गणितेही दहीहंडीतून मिळणाऱ्या पैशात गुंतलेले असते. शिवाय, डीजे, ध्वनिक्षेपक, बिगारी, माथाडी कामगार आदींनाही या ठिकाणी व्यवसाय मिळत असतो. तो आता बंद होणार आहे. मिळणाऱ्या वर्गण्याही आयोजकांना घेता येणार नाहीत. त्यामुळे आयोजनाचे आर्थिक थर कोसळणार असल्याचे चित्र आहे.
टेंभी नाक्यावरील सायलेन्स झोनचे काय?
टेंभी नाका, जांभळी नाका, चरई हा एक किलोमीटरचा परिसर सायलेन्स झोनमध्ये येत आहे. न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, शाळा आणि जिल्हा शासकीय रु ग्णालय या परिसरात आहे. मात्र, या भागातील आवाजाच्या निर्बंधांची कधीच काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नाही.
टेंभी नाका येथे दिहहंडी आणि
नवरात्रोत्सव मोठ्या गाजावाजामध्ये सुरु असतो. तर, जांभळी नाका येथेही चैत्री नवरात्रोत्सव आणि दिहहंडी मोठ्या आवाजामध्ये सुरु असते. दुसरीकडे आंबेडकर रोड परिसरातही दिहहंडी उभारण्यात येत असते.
या भागातील सायलेन्स झोनचे निर्बंध कधीच शिथील केले जात नाहीत. तरीही, या ठिकाणी उत्सव साजरे होत असतात. त्यामुळे आता जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी काय कारवाई करणार? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.