वृक्ष पुनर्रोपित करण्यासाठी जागा शोधा, उच्च न्यायालयाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 06:58 AM2020-01-22T06:58:03+5:302020-01-22T06:58:37+5:30
वडाळा ते कासारवडवली या मेट्रो-४ प्रकल्पासाठी मुलुंड चेकनाका ते कासारवडवली या पट्ट्यातील ९०० हून अधिक वृक्ष कापण्यात येणार आहेत.
मुंबई : वडाळा ते कासारवडवली या मेट्रो-४ प्रकल्पासाठी मुलुंड चेकनाका ते कासारवडवली या पट्ट्यातील ९०० हून अधिक वृक्ष कापण्यात येणार आहेत. तर त्यातील काहींचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. मात्र, वृक्ष ज्या ठिकाणाहून हलविण्यात येणार आहेत, त्या ठिकाणाहून ३० कि.मी. आतच त्यांचे पुनर्रोपण करण्यासाठी जागा शोधा आणि दहा दिवसांत अहवाल सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला मंगळवारी दिले.
ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीने सारासार विचार न करताच मेट्रो ४ प्रकल्पाआड येत असलेल्या काही वृक्षांची कत्तल करण्याचे तर काही वृक्ष पुनर्रोपित करण्यास परवानगी दिली. मुलुंड चेकनाका ते कासारवडवली या पट्ट्यातील बहुतांशी वृक्ष हे गटार, नाले किंवा काँक्रिटच्या रस्त्यावर आहेत. त्यामुळे या वृक्षांचे प्रत्यारोपण करण्याऐवजी नवी रोपटी लावण्यात यावी, अशी सूचना तज्ज्ञांच्या समितीने न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने ठाणे महापालिकेला पुनर्रोपणाचा प्रयोग करू दे, असे म्हटले.
या वृक्षांचे पुनर्रोपण ज्या जागेवरून वृक्ष हलविण्यात आले, त्या ठिकाणाहून ३० कि.मी. दूर करण्यात येणार असल्याची बाबही समितीने न्यायालयाच्या निदर्शनास आणली व त्यावर हरकत घेतली. त्यावर न्यायालयाने ठाणे महापालिकेला या झाडांना ज्या ठिकाणाहून हलविण्यात आले, त्या ठिकाणच्या ३० कि.मी. परिसरातच झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी जागा शोधण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले आहेत.
९00 हून अधिक वृक्षांची होणार कत्तल
मेट्रो ४ प्रकल्पातील मुलुंड चेकनाका ते कासारवडवली या पट्ट्यात प्रकल्पाआड येणाऱ्या ९०० हून अधिक वृक्षांची कत्तल होणार आहे. मात्र, तज्ज्ञांच्या समितीने नवी रोपटी लावावी असे सांगितले, पण न्यायालयाने येथील ३० कि.मी. परिसरात झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी जागा शोधण्यास सांगितले.