भटक्या श्वानाच्या हत्ये प्रकरणी दंड वा तुरुंगवासाची शिक्षा
By धीरज परब | Published: July 3, 2024 11:41 AM2024-07-03T11:41:49+5:302024-07-03T11:42:17+5:30
काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत सप्टेंबर २०२२ मध्ये रस्त्यावरील एका श्वानास लाथ मारून त्याची हत्या केली गेली होती.
मीरारोड - रस्त्यावरील एका भटक्या श्वानास लाथ मारून त्याची हत्या केल्या प्रकरणी आरोपीला ठाणे जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत दंड वा तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावली आहे. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्या नुसार आरोपीला शिक्षा झाल्याचे प्रकार खूपच कमी आहेत.
काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत सप्टेंबर २०२२ मध्ये रस्त्यावरील एका श्वानास लाथ मारून त्याची हत्या केली गेली होती. पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा व भादंवि नुसार गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्या प्रकरणी वरिष्ठांनी तपासाची जबाबदारी पोलीस हवालदार गंभीरराव राऊत यांच्यावर सोपवली होती.
आरोपीची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज सह लोकांची चौकशी पोलिसांनी सुरु केली. त्यात श्वानास लाथ मारणारा हा कैलास इलाकर सिंग हा आरोपी असल्याचे आढळून आले. या शिवाय पोलिसांना काही साक्षीदार तपासले. दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात सरकारी वकिलाच्या साहाय्याने बाजू मांडली. तपास अधिकारी यांनी केलेला सखोल तपास, फिर्यादी, पंच आणि साक्षीदार यांच्या साक्षीवरून कैलास सिंग विरुद्धच्या सबळ पुराव्यामुळे न्यायदंडाधिकारी आर.आर. भगत यांनी आरोपीला प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा नुसार दोषी ठरवत ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १० दिवसांची कैद तसेच भादंवि नुसार ३० हजार रुपये दंड किंवा दंडाची रक्कम न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. या बाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे.