मद्यपान करून वाहन चालवल्यास १० हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 06:44 AM2021-12-12T06:44:04+5:302021-12-12T06:47:59+5:30
ठाण्यात पाच दिवसांत अंमलबजावणी; मुंबईतही लवकरच होणार सुधारित दंडवसुली
मद्यसेवन करून वाहन चालवल्याबद्दल सध्या असलेला दोन हजार रुपयांचा दंड येत्या पाच दिवसांत १० हजार रुपये केला जाईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. केंद्र सरकारने या कायद्यात बदल केले असून राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यास मान्यता मिळाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. वाढीव दंड वसुलीसाठी यंत्रामध्ये बदल करण्याचे काम सुरू असून त्याला पाच दिवस लागतील, असे पाटील म्हणाले.
दरम्यान, मुंबईतही नवीन मोटार वाहन कायद्याबाबत प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असून ते पुर्ण झाल्यानंतर लवकरच सुधारित दंडाची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती मुंबई वाहतूक सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी दिली. मुंबईत वाहतूक पोलिसांना त्यांचे डिव्हाईस मास्टर अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे डिव्हाईस अपडेट नाही त्यांनी चलान करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने १ डिसेंबरपासून सुधारित मोटार वाहन कायदा लागू केला आहे. भरधाव वेगात वाहन चालवणे, विनासीटबेल्ट, विनाहेल्मेट, वाहतूक नियमांची पायमल्ली, दुचाकीवरून अतिरिक्त प्रवासी वाहतुकीसह अनेक वाहतूक नियमांत सुधारणा करून त्यात दंड वाढवण्यात आला. त्यात पाच ते दहापट रकमेची वाढ केली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये परवाना रद्द करण्याची येणार असल्याची तरतूद केली आहे.
मुंबईतही नवीन मोटार वाहन कायद्याबाबत प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असून ते पुर्ण झाल्यानंतर लवकरच सुधारित दंडाची अंमलबजावणी केली जाईल.
राजवर्धन सिन्हा, मुंबई वाहतूक सहपोलीस आयुक्त