खातीवलीतील फार्महाऊसला ५० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:24 AM2021-03-30T04:24:21+5:302021-03-30T04:24:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसारा : कोरोनाचे नियम पायदळी तुडवत होळी पार्टीसाठी शंभरहून अधिक जणांची गर्दी जमवल्याप्रकरणी शहापूर तालुक्यातील खातीवली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कसारा : कोरोनाचे नियम पायदळी तुडवत होळी पार्टीसाठी शंभरहून अधिक जणांची गर्दी जमवल्याप्रकरणी शहापूर तालुक्यातील खातीवली येथील सृष्टी फार्म हाऊसवर शहापूरच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी पथकाला उपस्थितांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन तसेच मास्कचा वापर न केल्याचे आढळून आले. त्यामुळे फार्महाऊस मालकाला ५० हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला.
राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्य सरकारने हॉटेल, रिसॉर्ट, विवाह कार्यालय, धार्मिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणी कडक निर्बंध घातले आहेत. तसेच तेथे नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनास दिले आहेत. असे असतानाही शहापूर तालुक्यातील खातीवली वाशिंद येथील व भातसा नदीपात्रालगत असलेल्या सृष्टी फार्महाऊसवर रविवारी होळी पार्टीसाठी शंभरहून अधिक जणांनी गर्दी केली होती. तसेच त्यांनी मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचा नियमही पायदळी तुडवले होते. ही बाब निदर्शनास येताच तहसीलदारांच्या पथकाने या फार्महाऊसवर छापा टाकला. यावेळी फार्महाऊसच्या मालकास शहापूर सूर्यवंशी यांनी ५० हजाराचा दंड ठोठावला. तसेच पुढच्या वेळी नियमबाह्य काम केल्यास फार्महाऊसला सील लावण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाई पथकात, नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण, तलाठी रूपेश मेरठ, मिलिंद राऊत सहभागी झाले होते.
दरम्यान, तहसीलदारांच्या धडक कारवाईमुळे हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊस, चालकांचे धाबे दणाणले आहेत.
---------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घातलेले निर्बंध, नियम शहापूर तालुक्यातील हॉटेल, रिसॉर्ट, दुकानदार यांनी पाळून प्रशासनास सहकार्य करावे. जनसामान्यांनीही मास्कचा वापर करावा. गर्दी करणे टाळावे. नियम तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- निलिमा सूर्यवंशी, तहसीलदार, शहापूर
------------------------