प्रकल्पांची कामे मुदतीपूर्वीच पूर्ण करा - एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:35 AM2018-12-31T00:35:57+5:302018-12-31T00:36:25+5:30
अत्यंत निकड असलेले प्रकल्प मुदतीपूर्वीच पूर्ण करण्याचा ‘एमएसआरडीसी’चा हातखंडा आहे.
कल्याण : अत्यंत निकड असलेले प्रकल्प मुदतीपूर्वीच पूर्ण करण्याचा ‘एमएसआरडीसी’चा हातखंडा आहे. सहापदरी रस्ता तसेच वाहतूकदृष्ट्या अत्यंत निकडीच्या असलेल्या पत्रीपुलाचे काम मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान ‘एमएसआरडीसी’ने स्वीकारावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शीळफाटा-कल्याण-भिवंडी रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या आणि नवीन पत्रीपुलाच्या कामाचे भूमिपूजन रविवारी पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनीता राणे, आमदार सुभाष भोईर, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार, केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ पलावा जंक्शन येथे झाला. त्यानंतर, नव्या पत्रीपुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले. याच ठिकाणी मुख्य कार्यक्रम पार पडला. दरम्यान, वाहतूककोंडीमुळे पालकमंत्र्यांना कल्याण फाट्यापासून सोनारपाडापर्यंत विरूद्ध दिशेने वाहन चालवून कार्यक्रमस्थळी पोहोचावे लागले. त्यामुळे पालकमंत्र्यांनीच नियम तोडल्याची चर्चा सुरू होती.
शिंदे म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीसह अन्य बाजूच्या शहरांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असून अनेक आंदोलनेही झाली. दरम्यान, हे दोन्ही प्रकल्प महत्त्वपूर्ण असून त्यामुळे निश्चितच वाहतूककोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. तीस महिन्यांत सहापदरी रस्ता, तर आठ महिन्यांत पत्रीपूल पूर्ण केला जाणार आहे. मात्र, एमएसआरडीसीने त्याहीपेक्षा लवकर हा पूल बांधण्याचा प्रयत्न करावा, असे शिंदे म्हणाले. एमएसआरडीसीच्या माध्यमातून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले असून नागपूर-मुंबई हे ७०० किलोमीटरचे १० ते १५ तासांचे अंतर सहा तासांवर येणार आहे. ठाणे-बोरिवली हे दोन तासांचे अंतर एका बोगद्याच्या माध्यमातून १० मिनिटांत कापले जाणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. राज्यमंत्री चव्हाण यांनीही या प्रकल्पांची कामे युद्धपातळीवर व्हावीत, अशी सूचना केली. दरम्यान, सहापदरी रस्त्यामुळे बाधित होणारे जमीनधारक, शेतकऱ्यांना मोबदला देण्याचा निर्णय घेण्याआधीच भूमिपूजनाच्या कामाचा घाट घातल्याचा आरोप करत भूमिपुत्रांनी कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी केली. आधी मोबदला द्या, मगच कामाला सुरुवात करा, अशी मागणी त्यांनी केली. शिष्टमंडळातर्फे पालकमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले. त्यावर भूमिपुत्रांना मोबदला मिळेल. भूमिपुत्रांच्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी समितीकमिटी स्थापन केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
‘ती’ मार्गिका चुकीची
नुकत्याच पार पडलेल्या मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमात राज्यमंत्री चव्हाण यांनी डोंबिवली मेट्रोची मागणी केली होती. त्याबाबत बोलताना भोईर यांनी, मेट्रोच्या मार्गात दाखवण्यात आलेली मार्गिका चुकीची आहे.
त्याचा संबंधितांना फायदा होणार नाही, असा टोला चव्हाणांना लगावला. यावर जास्तीतजास्त प्रवाशांना फायदा होईल, त्याच मार्गाने मेट्रो नेण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, असे चव्हाण यांनी उत्तर दिले.
तर, प्रस्तावित कल्याण मेट्रो ही तळोजाहून शीळफाटामार्गे आली पाहिजे. तसेच बिर्ला कॉलेजमार्गे ही मेट्रो नेण्याबाबतही आपण मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, असे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.