ट्रिपल तलाकप्रकरणी अखेर गुन्हा दाखल; पतीसह सासू, सासरेही आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 12:41 AM2019-05-16T00:41:03+5:302019-05-16T00:42:18+5:30
मागील आठवड्यात व्हॉट्सअॅप मेसेजच्या माध्यमातून पत्नीला दिलेल्या तीन तलाकप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अखेर पतीसह सासू, सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडी : मागील आठवड्यात व्हॉट्सअॅप मेसेजच्या माध्यमातून पत्नीला दिलेल्या तीन तलाकप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अखेर पतीसह सासू, सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील पीडित महिला आरजू ही सध्या कल्याण, कोळसेवाडी या ठिकाणी वास्तव्यास असून नदीम शेख याच्याबरोबर तिचा विवाह २०१४ साली झाला होता. लग्नानंतर काही काळातच आरजू हिचा पती नदीम, सासू आयशा व सासरे यासिन शेख यांनी हुंड्यासाठी मानसिक व शारिरीक छळ सुरू केला. तिच्याकडे माहेरहून पाच लाख रूपये आणण्यासाठी तगादा लावला आणि तिला मारहाण करून घराबाहेर काढले. त्यामुळे ती शहरातील आपल्या नातेवाइकांकडे वास्तव्यास असताना, तिच्या व्हॉट्सअॅपवर पतीने तीन वेळा तलाक दिल्याचा मेसेज पाठवला.
याप्रकरणी पीडित महिला मागील पंधरा दिवस पोलीस व महिला मंडळांकडे न्यायासाठी फिरत होती. याप्रकरणी पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी पूर्ण तपासाअंती गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन पीडित महिलेला दिले. त्यानुसार मंगळवारी भोईवाडा पोलीस ठाण्यात महिलेचा जबाब नोंदवून पती नदीम व उत्तरप्रदेश येथे राहणारे सासरे यासीन व सासू आयेशा या तीन जणांविरोधात भादंवि कलम ४९८(अ), ३२३, ५०४, ३४ यासह मुस्लिम स्त्रियांच्या लग्नाचे हक्क संरक्षण करणारे २९ फेब्रुवारी २०१९ च्या अध्यादेशचे कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.