नामांकित कंपनीचे बनावट पत्रे विकणाऱ्या व्यापार्याविरूद्ध ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 06:59 PM2018-04-04T18:59:27+5:302018-04-04T18:59:27+5:30
बनावट पत्र्यांवर नामांकित कंपनीचे शिक्के मारून ते विकणार्या एका व्यापार्याविरूद्ध ठाण्यातील राबोडी पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला.
ठाणे : बनावट पत्रे विकणार्या एका व्यापार्याविरूद्ध राबोडी पोलिसांनी मंगळवारी कॉपीराईट अॅक्टअन्वये कारवाई केली. त्याच्याकडून ४ लाख ६१ हजार माल पोलिसांनी हस्तगत केला.
झरार नसीबउल्ला खान हे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. राबोडी येथील शिवाजी नगरात राहणार्या या आरोपीचे हरिदास नगरात गोल्डन टिंबर ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. जेएसडब्ल्यू कंपनीचे बनावट पत्रे तो विकत असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. कंपनीने या माहितीची खातरजमा केल्यानंतर राबोडी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव यांनी या व्यापार्याविरूद्ध कारवाई केली. राबोडी पोलीस आणि जेएसडब्ल्यू कंपनीच्या अधिकार्यानी झरारच्या दुकानातील पत्रे तपासले असता, त्यावर कंपनीचे शिक्के होते. मात्र हे पत्रे कंपनीचे नसल्याचे जेएसडब्ल्यूच्या अधिकार्यानी सांगितल्यानंतर दुकानातील ४ लाख ६१ हजार १00 रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला. कंपनीचे कर्मचारी पियुष यशवंत राऊत यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार आरोपीविरूद्ध कॉपीराईट अॅक्ट १९५७ च्या कलम ५१, ६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने माल कुठून आणला याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बनावट पत्र्यांवर त्याने स्वत: जेएसडब्ल्यू कंपनीचे शिक्के मारले किंवा त्याला या बनावट मालाचा आणखी कुणी पुरवठा केला याचा तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी महेश जाधव यांनी सांगितले.