अंबरनाथ, बदलापूरमधील कारखान्यांमध्ये फायर ऑडिट केवळ नावापुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:09 PM2020-02-23T23:09:38+5:302020-02-23T23:09:53+5:30

नियमानुसार अग्निशमन विभागाच्या माध्यमातून सेफ्टी ऑडिट होणे बंधनकारक असले तरी आर्थिक हितसंबंध जपले जात असल्याने अग्निशमन विभाग चुकीच्या पद्धतीने सुरक्षेची चाचणी करीत आहेत.

Fire audit at factories in Ambarnath, Badlapur to name only | अंबरनाथ, बदलापूरमधील कारखान्यांमध्ये फायर ऑडिट केवळ नावापुरतेच

अंबरनाथ, बदलापूरमधील कारखान्यांमध्ये फायर ऑडिट केवळ नावापुरतेच

googlenewsNext

अंबरनाथ शहर हे औद्योगिक शहराच्या नावाने या आधीपासूनच नावारूपाला आले आहे. या शहरात एक हजाराहून अधिक कारखाने असले तरी त्या कारखान्यांच्या सुरक्षेबाबत एमआयडीसी आणि त्यांचे अग्निशमन दल गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे. नियमानुसार अग्निशमन विभागाच्या माध्यमातून सेफ्टी ऑडिट होणे बंधनकारक असले तरी आर्थिक हितसंबंध जपले जात असल्याने अग्निशमन विभाग चुकीच्या पद्धतीने सुरक्षेची चाचणी करीत आहेत. त्यामुळे आगीच्या घटना घडल्यावर कारखान्यातील अग्नीसुरक्षा यंत्रणा कूचकामी ठरते.

मोरीवली, वडवली आणि चिखलोली एमआयडीसी असे तीन रासायनिक पदार्थांवर प्रक्रिया करणारे केमिकल झोन आहेत. आगीच्या घटना सर्वाधिक प्रमाणात या क्षेत्रातच लागत असल्याने त्यांची आग प्रतिबंधक यंत्रणा सक्षम आहे की नाही याची चाचपणी करण्याचे अधिकार एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला आहे. मात्र एमआयडीसीचे अधिकारी आणि कारखानदार यांच्यात लागेबांधे असल्याने यंत्रणेकडे दुर्लक्ष केले जात आहे. नवीन कारखाना निर्माण झाल्यावर वर्ष-दोन वर्ष नीटनेटकेपणाने अग्नीसुरक्षेकडे लक्ष दिले जाते, मात्र त्यानंतर काही त्रुुटी आढळल्या तरी एमआयडीसीचे अधिकारी त्याकडे गांभीर्याने बघत नाहीत. अनेक आगीच्या घटना पाहिल्यावर एक बाब प्रकर्षाने जाणवते की एका कंपनीची आग भडकल्यावर त्याचा फटका शेजारी असलेल्या इतर कंपन्यांनाही बसतो.

मूळात एमआयडीसीचे प्लॉट देत असताना दोन कंपन्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याची कोणतीही पद्धत नसल्याने अपघातांची मालिका वाढत आहे. अंबरनाथच्या वडवळ एमआयडीसी भागात अनेक रासायनिक कारखाने असल्याने त्याठिकाणी सुरक्षेची चाचपणी योग्य प्रकारे होणे अपेक्षित आहे. मात्र त्याठिकाणीही सुरक्षेच्या उपाययोजना दुर्लक्षित केल्या आहेत. अनेक कारखान्यांमधील विद्युत वाहिन्यांचे नूतनीकरण करण्याची गरज असताना ते काम नियमतिपणे केले जात नाही. सोबत रासायनिक कारखान्यात ड्रायर आणि बॉयलर यांचा सर्वाधिक धोका असतानाही त्यांच्या देखभाल दुरु स्तीकडे विशेष लक्ष दिले जात नाही. जुन्या यंत्रणा सातत्याने चालविण्यात येत असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. यासोबत अनेक रासायनिक कारखान्यात योग्य प्रशिक्षण घेतलेले कामगार नसल्याने माणसाच्या चुकीमुळेही आगीच्या घटना घडतात. आगीच्या घटनांमध्ये कंपनीतील अग्नीविरोधी यंत्रणा सक्षम असेल तर ती आग लागलीच आटोक्यात आणणे शक्य आहे. मात्र ती यंत्रणा चालवणारे कामगारच प्रशिक्षित नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत कामगार सुरक्षितस्थळी जाण्याकडे प्रथम प्राधान्य देतात. त्यामुळे वेळेत आग आटोक्यात आणणे शक्य होत नाही. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचे संबंध असल्याने ठेकेदार सांगेल त्या पद्धतीनेच काम करतात. फायर सेफ्टीची चाचपणी करण्यासाठी अधिकारी आल्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सोय करणे एवढ्यापुरतेच काम केले जाते, असे येथील वास्तव आहे.

आग विझवण्यासाठी पाण्याची कमतरता
अंबरनाथच्या तुलनेत बदलापूरमध्ये कारखान्यांची संख्या कमी असली तरी केमिकल झोन मोठ्या प्रमाणात असल्याने त्याठिकाणीही आगीच्या घटना घडतात. आगीची घटना घडल्यावर अग्निशमन दलाचे जवान वेळेवर पोहचत असले तरी पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझवण्यात अनेक अडचणीही येतात. बदलापूरही आगीच्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. त्यामुळे या ठिकाणी आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी फायर सेफ्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे असे चित्र निर्माण होत आहे.

Web Title: Fire audit at factories in Ambarnath, Badlapur to name only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग