भिवंडीत भंडारी कंपाऊण्ड व कालवार येथील भंगाराची गोदामांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:35 PM2018-12-28T22:35:43+5:302018-12-28T22:38:47+5:30
भिवंडी : शहरातील नारपोली भागातील भंडारी कंपाऊण्डमध्ये आज शुक्रवारी पहाटे लागलेली आग मनपाच्या अग्निशामक दलाने शर्थ करून सकाळपर्यंत विझविली ...
भिवंडी : शहरातील नारपोली भागातील भंडारी कंपाऊण्डमध्ये आज शुक्रवारी पहाटे लागलेली आग मनपाच्या अग्निशामक दलाने शर्थ करून सकाळपर्यंत विझविली असताना सायंकाळी तालुक्यातील कालवार आगीची घटना घडली असून या आगीच्या भिषणतेमुळे ही आग विझविण्यासाठी रात्र उलटणार असल्याची माहिती आग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.आज घडलेल्या आगीच्या दोन घटनेने भंगाराच्या गोदामांचा विषय ऐरणीवर आला असून अशा बेकायदेशीर गोदामांवर कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यक्यता आहे.
शहरातील भंडारी कंपाऊण्डमधील लोकवस्तीत असलेल्या भंगाराच्या गोदामांस पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत प्लास्टिकच्या वस्तू, कागदी पुठ्ठा,धागा आदि साहित्यांचा मोठ्या प्रमाणावर साठा होता. अचानक पहाटेच्या वेळेस लागलेल्या आगीने गोदामातील सर्व ज्वलनशील साहित्यांनी पेट घेऊन आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी अग्निशामक दलास पाचारण करून घटनास्थळी दाखल झाले. मनपाच्या अग्निशामकदलाच्या ३ गाड्या सोबत ३ पाण्याच्या गाड्यांनी मिळून ही आग चार तासात विझविली. ही घटना घडल्यानंतर या आगीची धग गोदामाच्या आजूबाजूच्या रहिवासी वस्तीला लागून प्राणहानी होऊ नये म्हणून आजूबाजूच्या वीस-पंचवीस खोलीतील रहिवाश्यांना घराबाहेर काढले. शहरातील अग्निशामकदल ही आग विझवून सुस्कारा टाकत नाही तोच शुक्रवारी सायंकाळी कालवार गावातील जंम्बो गोदामास भिषण आग लागली.
भिवंडी-वसई रोडवरील कालवार गावाच्या हद्दीत मोठमोठी जम्बो गोदामे असुन त्यापैकी कागदी लगदा, पुठ्ठा व पॅकींगचे सामान दररोज कंटनेरमधून आणून या जम्बो गोदामातील विविध गोदामात साठविला जात होता. सायंकाळी आग लागल्यानंतर गोदामातील कामगारांनी गोदामाबाहेर पळ काढला. गोदामातील भंगाराला लागलेल्या आगीने भिषणता वाढल्यानंतर भिवंडी,ठाणे,कल्याण येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र कोणतीही प्राणहानी झालेली नाही. परिसरांत पाण्याची कमतरता आणि आगीची भिषणता पहाता ही आग विझविण्यास रात्रभर झटावे लागणार असून १२ तासापेक्षा जास्त वेळ जाणार असल्याची माहिती मनपा अग्निशामक दलाचे अधिकारी डी.एन.साळवी यांनी दिली. सदर आगीचे कारण आद्याप समजू शकले नाही.या आगीमुळे गोदामाचा पत्रा,अँन्गल व भिंती तुटल्याने गोदामाचे मोठे नुकसान झाले आहे.